
इंधनाचे दर गगनाला भिडल्याने वाहनधारकांकडून आता विजेवर चालणाऱया इलेक्ट्रिक गाडय़ांना पसंती दिली जात आहे. मुंबईकरांच्या पसंतीला विजेवरील गाडय़ा उतरल्या असून त्यांच्याकडून दर महिन्याला जवळपास एक हजार गाडय़ांची खरेदी करून परिवहन विभागाकडे नोंदणी केली जात आहे. यामध्ये चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकी गाडय़ांची संख्या मोठी आहे.
पेट्रोल-डिझेलवर चालणाऱया वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. ते कमी करण्याबरोबरच इंधनाची वाढती मागणी कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विजेवरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे कोरोना महामारीनंतर विजेवरील वाहनांच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार मुंबईत जानेवारीपासून ऑगस्टअखेरपर्यंत 5104 दुचाकींची, तर 2597 चारचाकी वाहनांची विक्री झाली असून त्याची नोंदणी परिवहन विभागाकडे झाली आहे. नोकरीनिमित्त दररोज 70-80 किलोमीटरचा प्रवास करणाऱया नोकरदारांकडून विजेवरील वाहनांना मोठी पसंती मिळत आहे.
विजेवरील वाहनांची नोंदणी
आरटीओ दुचाकी चारचाकी
ताडदेव 1165 925
अंधेरी 113 829
वडाळा 1184 399
बोरिवली 1657 444