रुळ तुटण्यास मुंबईची हवाच जबाबदार

प्रातिनिधीक फोटो

माहितीच्या अधिकारात रेल्वेचे उत्तर

मुंबई – कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकांदरम्यान गुरुवारी पहाटे लोकलचे पाच डबे रुळांवरून घसरून तब्बल अकरा तास मध्य रेल्वे विस्कळीत झाली. या अपघाताची चौकशी सुरू असली तरी रूळ तुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी म्हटले जात आहे. त्यामुळे रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्तीसह विविध गंभीर मुद्दे उपस्थित झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईच्या दमट-खार्‍या हवेमुळे लोखंडाला लवकरच गंज पकडत असल्याने रूळ कमकुवत होऊन तुटत असल्याने हे अपघात घडत असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबईत हिवाळ्यातील वातावरणातील तापमान बदलाचा फटका रुळांना बसून अनेकदा रुळास तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम होतो. हिवाळ्यात रूळ आकुंचन पावल्याने दुर्घटना होत असतात; पण अनेकदा देखभालीतील त्रुटी असल्याचाही फटका सेवेस बसत असल्याचे सांगण्यात येते.