मुंबईचे वाईल्ड लाईफ जगासमोर येणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टिझर लाँच

760

अडीचशेहून जास्त प्रकारचे पक्षी, चाळीसहून जास्त प्रकारचे प्राणी, पाच हजार प्रजातींचे जीवजंतू, समुद्री जीवन, किनारे, गुंफा, फुलझाडे, कांदळवन असे मुंबईचे वैभवशाली वाईल्ड लाईफ जगासमोर येणार आहे. पालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱया या चित्रपटाचा टिझर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. दादरच्या प्लाझा सिनेमागृहातील या सोहळ्याप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते.

महाराष्ट्र आणि देशात आढळणारी जैवविविधता 24 तास धावणाऱया मुंबईत आहे. मात्र याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. या पार्श्वभूमीवर मुंबईचे वाईल्ड लाईफ जगासमोर आणण्यासाठी पालिकेने चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळावी हा उद्देश आहे. ‘कर्नाटक वाईल्ड’ ही जगप्रसिद्ध फिल्म बनवणारे अमोघ वर्षा ही फिल्म बनवणार आहेत. आपण आतापर्यंत मुंबईत फक्त ‘चटई क्षेत्र’ याकडे लक्ष दिले. मात्र आता या फिल्मच्या माध्यमातून मुंबई चे नैसर्गिक सौंदर्य समोर येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जंगलाची आवड असणारा आयुक्त मुंबई महानगर पालिकेला प्रवीण परदेशी यांच्या रूपाने मिळाल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राहुल नार्वेकर, अभिनेत्री दिया मिर्झा, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते.

मुंबईच्या सौंदर्यात पालिकेच्या टीमचा वाटा

मुंबई स्वच्छ, सुंदर राखण्यासाठी पालिकेच्या टीमचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुंबई स्वछ ठेवणाऱया सफाई कामगारांची फिल्म ही दाखवण्यात आली. या फिल्मच्या माध्यमातून वाईल्ड मुंबई जगाला कळणार आणि आपण सर्व याचे साक्षीदार असल्याबद्दल भाग्यवान समजतो असेही त्यांनी सांगितले.

राणीच्या बागेत निसर्ग परिचय केंद्र

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात निसर्ग परिचय केंद्र सुरू करणार असल्याची माहिती आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली. यामध्ये मुंबईची जैव विविधता आणि संस्कृतीचे दर्शनही घडणार असल्याचे ते म्हणाले. तसेच अजमेर येथे होणाऱया राष्ट्रीय प्रदर्शनात मुंबईच्या संस्कृती-परंपरा आणि जैव विविधतेचे दर्शन घडवणार असल्याचेही ते म्हणाले.

‘तान्हाजी’ मंत्रिमंडळासोबत पाहणार

आपल्या शौर्याने इतिहास निर्माण करणारा योद्धा ‘तानाजी’ यांच्यावरील चित्रपट आपण संपूर्ण मंत्रिमंडळासोबत पाहणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या