मुंब्य्राच्या सिम्बॉयसिस शाळेची मीडियात ‘बुरखाबंदी’

बंदी घातलीच नसल्याचा व्यवस्थापनाचा दावा

सामना प्रतिनिधी । ठाणे

कौसा भागात असलेल्या प्रसिद्ध सिम्बॉयसिस शाळेत व्यवस्थापनाने बुरखाबंदी जाहीर केल्याची बातमी मीडियात आज दिवसभर पसरली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असून धार्मिक रंग देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सांगत व्यवस्थापनाने बंदीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. सिम्बॉयसिस शाळेत बुरखाबंदी यापूर्वीही नव्हती, आताही नाही आणि पुढेही असणार नाही, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

मुंब्य्रातील सिम्बॉयसिस शाळेत दीड हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत असून शाळा सुटल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. बसेसमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांची रोजच धांदल उडते. ८ डिसेंबर रोजी दोन महिला मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्या कोण आहेत हे न समजल्याने सुरक्षारक्षकाने त्यांना हटकले. या घटनेचे भांडवल करीत काही जणांनी मीडियाकडे धाव घेतली आणि बुरखाबंदी झाली हो, असे सांगत शाळेबद्दल गैरसमज निर्माण केला असल्याचे सिम्बॉयसिस शाळेचे ट्रस्टी कमलराज खत्री ऊर्फ पप्पू सर यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

अपहरण झाल्यास जबाबदार कोण?
सिम्बॉयसिस शाळेमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांबरोबर अनेक हिंदू विद्यार्थीही शिकतात. मात्र बुरखाबंदी केली नसतानाही विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असून एखाद्या मुलाचे अपहरण झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या