Video : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक

1367

मुंब्र्यामधील तरुणांच्या दादागिरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणांनी वाहतूक पोलिसांच्या वर्दीवत हात टाकल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तसेच तरुणांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना भररस्त्यात मारहाण केली व कपडेही फाडले. यावेळी एका तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई सुरु असताना काही तरुणांनी व महिलेने राडा घाला. मुंब्रा कन्व्हर नगर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांच्या कारवाईदरम्यान काही दुचाकीस्वारांना पकडले होते. यावेळी त्यांनी थेट राडा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी वाहतूक परवाना ताब्यात घेतल्याने तरुणांनी जाब विचारत वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. रस्त्याच्या बाजूलाच हा प्रकार सुरु असल्याने लोकांची मोठा गर्दी झाली होती. तरुणांची पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली होती. अंगद मुंडे, प्रशांत गोसावी, दिनेश राऊत व विनायक वाघमारे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरी
दरम्यान, या राडादरम्यान झालेल्या गर्दीचा फायदा घेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईलदेखील चोरण्यात आला. पोलिसांनी अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरेशी व फैजान शेख या चौघांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. एकजण फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या