अधिकाग्रहणाच्या मुहूर्ताला लागले ‘ग्रहण’

76

मनमाड, (सा.वा.)

मनमाड, येवला, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांतील नवनिर्वाचित थेट नगराध्यक्ष व नगरसेवकांना अधिकृत खुर्चीवर जेव्हा बसायला मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या अधिकारग्रहणाच्या मुहूर्ताला जणू ‘ग्रहण’च लागले आहे. त्यामुळे सध्या या सर्व नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डाच्या साफसफाईचे काम मात्र मनापासून सुरू केलेय.

आतापर्यंत जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष निवडून त्याला सूत्रे दिली जात होती; परंतु आता निवडून आलेल्या नगराध्यक्षाला स्वत:च्याच अध्यक्षतेखाली पहिली सभा बोलवायची असल्याने व स्वत:च नगराध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान होत कारभार सुरू करायचा असल्याने हा आदेश कसा व कुठून येतो याच्या प्रतीक्षेत सध्या नूतन नगराध्यक्ष आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांच्या नूतन नगराध्यक्षांचे पदग्रहण, उपनगराध्यक्ष, स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्य नियुक्ती आदींचा मुहूर्त नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्या विशेष बैठकीत जिल्हाधिकारी येत्या २६ डिसेंबरला काढण्याच्या तयारीत असतानाच शासनाच्या नव्या निर्णयाने त्याला करकचून ब्रेक लागला आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता हा अधिकार नवनिर्वाचित नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. पण त्यासंबंधीचा कोणताही अध्यादेश अद्याप जिल्हाधिकारी किंवा नगरपालिकेकडे न आल्याने संभ्रमावस्था कायम आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेची निवडणूक २७ नोव्हेंबरला होऊन निकाल २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. मात्र अधिकारग्रहणाचा मुहूर्त अद्याप लागत नसल्याने नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांत अस्वस्थता आहे. गेल्या पंचवार्षिकप्रमाणे हा मुहूर्त या २६ डिसेंबरला लागणार होता. पण राज्य शासनाने शुक्रवारी अधिवेशनात निर्णय घेऊन पहिली सर्वसाधारण सभा बोलावण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे अधिकार काढून घेतले व ते नूतन थेट नगराध्यक्षांना दिले. याबाबतचा कोणतीही अधिसूचना अद्याप संबंधितांना प्राप्त झालेली नाही.

गेल्या नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी काय घडले? त्यावेळी थेट नव्हे तर प्रभागांतून निवडून आलेल्या नगरसेवकांतून बहुमताने नगराध्यक्ष निवडला गेला.

निवडणूक झाली ११ डिसेंबर २०११ रोजी, निकाल जाहीर झाला १२ डिसेंबरला, जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य निवडीसाठी पहिली सर्वसाधारण सभा व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १९ डिसेंबरला नगराध्यक्षांची निवड व सत्ताग्रहण झाले २६ डिसेंबर २०११ रोजी. त्यानुसार यावेळीही जिल्हाधिकार्‍यांनी २६ डिसेंबरला पहिली सर्वसाधारण सभा बोलावण्याची तयारी सुरू केली असतानाच नव्या शासकीय निर्णयामुळे त्या प्रक्रियेला आता ब्रेक लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या