मुंजवाडमध्ये राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधींना गावबंदी; वेशीवरच लागले भव्य फलक

राज्य व केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी कांदा प्रश्नावर मूग गिळून गप्प आहेत. अनुदानाची घोषणा होऊनही शेतकऱयांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही. या कारणामुळे बागलाण तालुक्यातील मुंजवाड गावात राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्यात आली आहे. यासाठी वेशीवरच भव्य फलक लावण्यात आला असून तो तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील कांदा आधीच खराब झाला होता. तरीही तो शेतकऱयांनी मोठय़ा हिमतीने चाळीत साठवला, परंतु अवकाळीचा फटका बसला आणि खराब झाला. अनुदानाची घोषणा होऊनही कोणतीच कार्यवाही नाही. या प्रश्नावर बोलण्यास राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी तयार नाहीत. त्यामुळे त्यांना वेशीवरच रोखून जाब विचारण्याची वेळ आली आहे. गावाच्या चारही बाजूने गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. यावेळी मुंजवाड गावातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी क्रांती मोर्चाचे भिकाजी अभा, वैभव आहिरे, नानाजी जाधव, महेंद्र जाधव, उमेश खैरनार, विनोद जाधव, भगवान जाधव, भास्कर बागुल, योगेश जाधव, काशीनाथ जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पेंद्र सरकारने नाफेडमार्फत 3 लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली खरी, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. कांदा अनुदान जाहीर होऊन दीड-दोन महिने झाले तरी अद्याप दमडीही मिळाली नाही. सत्ताधाऱयांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. – कुबेर जाधव, संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना