पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

632

मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी)  रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध आणले आणि लाखो ठेवीदार, खातेदारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. बँकेत पैसे अडकल्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. पैसे अ़डकल्यामुळे आतापर्यंत दोन खातेदारांचा मृत्यू झाला असून शुक्रवारी यामुळे आणखी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी पीएमसी बँकेचे खातेदार मुरलीधर धारा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते 80 वर्षाचे होते.  याआधी पंजाब महाराष्ट्र बँकेचे खातेदार फत्तेमाल पंजाबी, संजय गुलाटी यांचा देखील मृत्यू झाला आहे. ओशिवर्‍यात राहणारे संजय गुलाटी (51) हे जेट एअरवेजमध्ये कामाला होते. जेटला टाळे लागल्यामुळे संजय यांची नोकरी गेली होती. नोकरीतून त्यांना मिळालेली 90 लाखांची बचत पीएमसीच्या ओशिवरात शाखेत ठेवली होती. त्याच्यातून येणार्‍या व्याजातून त्यांच्या कुटुंबीयांचा घरखर्च सुरू होता. मात्र, घोटाळ्यानंतर मिळणार्‍या तुटपुंज्या पैशातून घरखर्च चालवणे कठीण झाले होते. त्यांनी काल मुंबईतील आझाद मैदानात पीएमसी खातेदारकांच्या निदर्शनात भाग घेतला होता. निदर्शनावेळी अनेक खातेदारांच्या व्यथा त्यांनी जवळून पाहिल्या. त्यानंतर ते घरी आले. घरी जेवत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

 

आपली प्रतिक्रिया द्या