सणसवाडी येथे भरदिवसा गोळीबार; तरुण ठार

111

सामना ऑनलाईन । सणसवाडी

दुचाकीवर आलेल्या दोघांनी केलेल्या गोळीबारात सणसवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान, तरुणाला काल मोठ्या रकमेचा मटका (जुगार) लागला होता. काही लाखात असणारी ही रक्कम त्याला मिळाली होती. यामुळे या रकमेसाठी खून करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. आज सकाळी ११.३०च्या सुमारास ही घटना घडली.

गंगाराम बाबूराव दसरवाड (वय ३०, मूळगाव शिकारा, मुखेड, जि. नांदेड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. सागर प्रकाश दरेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गंगाराम हा सणसवाडी येथे गेली १० वर्षांपासून राहत असून, तो एका ठेकेदाराकडे विविध कंपन्यांमध्ये दूध आणि कॅन्टीनसाठी चपाती पुरवण्याचे काम करीत होता. याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाराम हा सकाळी सणसवाडी परिसरातील कंपन्यांना दूध देऊन सणसवाडी गावाकडे दुचाकीवर येत होता. गावाजवळील दशक्रिया घाटाजवळ दबा धरून बसलेल्या दोघांनी गंगारामवर गोळ्या झाडल्या. यामुळे तो जागीच कोसळला. यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून सणसवाडीच्या दिशेने पळून गेले. पाठीमागून येणाऱ्या लोकांनी गंगारामला सणसवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी वाघोली येथील आयमॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या ठिकाणी केलेल्या तपासणीत गंगारामला डाव्या हाताच्या दंडावर, पोटात आणि हृदयाच्या बाजूला गोळी लागल्याचे समोर आले. यामुळे नेमक्या किती गोळ्या लागल्या, हे शवविच्छेदनानंतर समोर येईल. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

घटनेची माहिती समजताच, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी गणेश मोरे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. स्थळ पंचनामा करताना एक रिकामी पुंगळी आढळली. दरम्यान, पोलीस विविध शक्यता गृहित धरून तपास करीत असून, पोलीस पथक हल्लेखोरांच्या मागावर रवाना झाले आहे. शिक्रापूर पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या