घाटकोपरमध्ये सिगारेटवरून तरुणाची हत्या,तिघा सराईत गुंडांना अटक

1143
प्रातिनिधिक फोटो

पानटपरीवर सिगारेटवरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करणाऱया तिघा सराईत गुंडांना गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने घाटकोपरच्या वैतागवाडीत पकडले. त्यातील दोन आरोपी तडीपार असून तरीदेखील त्यांनी घाटकोपरमध्ये येऊन हत्येचा गुन्हा केला.

घाटकोपरच्या वैतागवाडीत राहणाऱया सैफ खान या तरुणाची त्याच परिसरात राहणाऱया शाबीर इक्बाल शेख (27), शाहीद ऊर्फ चिंगू इक्बाल शेख (29) आणि अब्दुल हमीद इक्बाल शेख (32) यांच्याशी वाद झाला होता. या वादातून तिघांनी मिळून सैफला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या सैफला राजावाडी रुग्णालयात व त्यानंतर शीव रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचार सुरू असताना सैफचा मृत्यू झाला. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्यात त्या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे युनिट-7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्काळ तपास सुरू करून शाबीर, शाहीद आणि अब्दुल यांना वैतागवाडी परिसरातून पकडले आणि पुढील कारवाईसाठी घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, शाबीर आणि शाहीद या दोघांना मुंबई, उपनगर आणि ठाणे जिह्यातून 2018 साली दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तसेच या तिन्ही आरोपींवर रॉबरी आणि गंभीर दुखापत केल्याचे घाटकोपर पोलीस ठाण्यात अनेक गुह्यांची नोंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या