प्रियकराने केली विवाहीत प्रेयसीची हत्या; पतीही गंभीर जखमी

32

सामना प्रतिनिधी । नागपूर

पतीला सोडून प्रियकरासोबत संसार थाटल्यानंतर पुन्हा पतीकडे परत गेलेल्या प्रेयसीची संतापलेल्या प्रियकराने डोक्‍यात कुदळ घालून हत्या केली. पत्नीच्या बचावासाठी आलेल्या पतीवरही प्रियकराने कुदळीने हल्ला केला. सोमवारी जयताळामधील दाते लेआऊटमध्ये ही घडली. गितेश्‍वरी मडावी (२१) असं मृत महिलेचे नाव आहे, तर चंद्रकुमार मडावी (२५) असं जखमी पतीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी सचिन पेंदूर पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकुमार मडावीचा विवाह तीन वर्षांपूर्वी गितेश्‍वरीसोबत झाला होता. लग्नाच्या सहा महिन्यानंतर गितेश्‍वरीला दिवस गेले. मात्र, चंद्रकुमारला मुल नको होते म्हणून तो पत्नीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकत होता. पतीच्या दबावामुळे गितेश्‍वरी गर्भपात करण्यास तयार झाली. गर्भपात केल्यानंतर काही दिवसातच गितेश्‍वरीला चंद्रकुमारने नागपुरात माहेरी परत आणले आणि तेव्हापासून तो घ्यायला आला नव्हता.

गितेश्वरीचे वडील ज्याठिकाणी मजुरीचं काम करत होते, तेथेच सचिन पेंदूरचा भाऊ प्रेम पेंदूर मजूर म्हणून काम करत होता. दरम्यान भावाला भेटण्यासाठी आरोपी सचिन पेंदूर दर आठवड्याला कामाच्या ठिकाणी येत होता. त्यावेळी बांधकामावर काम करणाऱ्या गितेश्‍वरीशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्याही अनैतिक संबंधाची माहिती गितेश्‍वरीच्या आईवडीलांना मिळाली. त्यांनी याला विरोध दर्शवित सचिनला दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र विरोध झुगारून दोघेही डिसेंबर २०१७ ला बल्लारशहाला पळून गेले. परंतू, सचिनला दारूचे व्यसन असल्यामळे तो गितेश्‍वरीला मारहाण करू लागला. अखेर सचिनला वैतागून गितेश्वरी पुन्हा वडिलांकडे आली.

रविवारी मध्यरात्री सचिन पेंदूरने झोपेत असलेल्या गितेश्वरीवर कुदळीने डोक्‍यावर हल्ला केला. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून बचावासाठी आलेल्या पती चंद्रकुमारवरही सचिनने हल्ला केला आणि तेथून पळून गेला. गितेश्‍वरी आणि चंद्रकुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्‍टरांनी गितेश्‍वरीला मृत घोषित केले तर पतीवर उपचार सुरू आहेत. गितेश्वरीची आई संगीता परते यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन पेंदूरविरूध्द हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या