पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या, आठ संशयित ताब्यात

46

सामना ऑनलाईन, नाशिक

पंचवटीतील अवधूतवाडी येथे गुरुवारी रात्री एका टोळक्याने कोयता व तलवारीचे वार करीत सराईत गुन्हेगाराची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित गुजरातच्या दिशेने पळणाऱ्या आठ संशयितांना ताब्यात घेतले, त्यापैकी तिघे अल्पवयीन असल्याचे समजते.

दिंडोरी रोड परिसरातील रहिवाशी अजित शशिकांत खिच्ची (२८) हा गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंगेश मधुकर बागुल या मित्रासोबत अवधूतवाडी येथील समाज मंदिराजवळ बसला होता. त्यावेळी आठजणांचे टोळके तेथे आले, त्यांनी पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढून हातातील कोयता व तलवारीने खिच्चीवर हल्ला चढविला. डोके, छाती व पोटावर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याचा मित्र बागुल पळून गेल्याने बचावला.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बागुल याच्या फिर्यादीवरुन आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळक्याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या