बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेहुण्याची हत्या

868
murder-knife

बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेहुण्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची घटना मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे घडली आहे. कवठेपिरान येथील निखील सुतार याच्या बहिणीने गावातीलच ओंकार माने याच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते दोघे बाहेरगावी गेले होते.

काही दिवसांपूर्वी ओंकार पत्नीसह गावात राहण्यास आला होता. त्यामुळे निखीलचा त्याच्यावरील राग वाढला होता. गावातील चव्हाणवाड्याजवळ शनिवारी रात्री ओंकार उभा असल्याचे पाहून निखालने धारदार शस्त्राने त्याच्यावर अनेकदा वार केले. त्यामुळे ओंकार गंभीर जखमी झाला होता. त्यातील काही वार ओंकारच्या पोटात वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ओंकारचा मृत्यू झाल्याचे समजताच निखील स्वतःहून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने कवठेपिरान गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या