राजस्थानात बारावीच्या मुलीचा मृतदेह आढळला; आरोपी शिक्षक फरार

राजस्थानच्या भरतपूरमध्ये रस्तालगत असलेल्या एका शेतात एका बारावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. मुलगी मथुरा गेट परिसरातील असून तिचे कुटुंबीय ढाबा चालवतात. तिच्या शिक्षकाने तिला फूस लावत पळवून नेले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून त्याने तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुलगी दहावीत असल्यापासून ही शिक्षक तिच्या मागे होता, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. तो मोबाईलवर नेहमी मेसेज करून मुलीला त्रास देत होता. दोन दिवसांपूर्वी सकाळी उठल्यावर मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. तिचा शोध घेतल्यावरही ती सापडली नाही. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिली.

पोलीसांनी शोध घेतला असता कुम्हेर ठाणा परिसरात रस्त्यालगतच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला. मुलीच्या कुटुंबीयांना बोलावत मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी मृतदेह मथुरा गेट परिसरात ठेवत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनही करण्यात आले. आरोपींना अटक करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यावर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

शाळेच्या शिक्षकाने मुलीला फूस लावत पळवून नेले होते. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. तसेच घटनेनंतर तो शिक्षक फरार आहे. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. फरार शिक्षकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच इतर पैलूंचा विचार करून तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या