तरुणाला झाडाला बांधले आणि नंतर जाळून मारले, पोलीस अधिकाऱ्यांसमोर जमावाचा हैदोस

3963

एका तरुणाला झाडाला बांधून त्याला जाळून ठार मारण्यात आले. अंबिका पटेल असे या तरुणाचे नाव असून ही घटना फतनपूर भागातील भुजौनी गावातली आहे. या घटनेनंतर गावामध्ये जबरदस्त हिंसा भडकली आणि तीन तास पोलीस अधिकाऱ्यांसमोर जमावाने अक्षरश: हैदोस घातला. या हिंसाचारात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तरुणाच्या हत्येमुळे भडकलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली ज्यामुळे ते गावातून पळून गेले.

भुजौनी गावातल्या लोकांनी पोलिसांच्या 2 गाड्यांसह 5 गाड्या पेटवून दिल्या. हा हिंसाचार अंबिकाच्या हत्येनंतर सुरू झाला होता. त्याचा मृतदेह आंब्याच्या बागेत सापडला होता. अंबिका आणि एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. ही तरुणी नंतर पोलीस दलात भरती झाली होती. अंबिका आणि त्याच्या प्रेयसीने लग्न करायचे ठरवले होते. त्याच्या प्रेयसीची दुसऱ्या शहरात पोस्टींग झाल्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. ही बाब मुलीच्या घरच्यांना पसंत नव्हती. अंबिकाने त्याच्या प्रेयसीसोबतचा एक फोटो फेसबुकवर अपलोड केला होता. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी अंबिकाला अटक केली. 1 मे रोजी कोरोनामुळे अंबिकाची पॅरोलवर मुक्तता करण्यात आली. 1 जून रोजी म्हणजेच सोमवारी त्याला ठार मारण्यात आले.

पोलीस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की अंबिकाला झाडाला बांधून जाळण्यात आले होते. त्याची हत्या प्रेयसीच्या घरच्यांनीच केली असावी असा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या