बाबासाहेबांनी निवास केलेल्या लंडनमधील घरातील संग्रहालय बंद होण्याची भीती ?

1038

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी असताना ज्या घरात राहिले होते ते घर महाराष्ट्र शासनाने विकत घेतले होते. या घरामध्ये बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारे संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. हे संग्रहालय बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. तिथल्या स्थानिक प्रशासनाने या घरातील संग्रहालयाला मंजुरी देण्यास नकार दिला आहे. याबाबतचे वृत्त इंग्रजी वर्तमानपत्रात छापण्यात आले आहे.

10 किंग हेन्री रोडवरील हे घर महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर 2015 साली 31 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 2550 स्क्वेअर फुटावर वसलेल्या या चार मजली घरामध्ये घटनाकार बाबासाहेब राहिले होते. सरकारने हे घर ताब्यात घेतल्यापासून हिंदुस्थानातीलच नाही तर अनेक देशातील नागरिकांनी या घराला भेट दिली आहे.

मुंबई मिरर या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे की  हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांनी फेब्रुवारी 2018 रोजी या घराला पूर्वलक्ष प्रभावाने संग्राहालयात रुपांतरीत करण्याची परवानगी द्यावी यासाठी अर्ज केला होता. मात्र ही विनंती कॅमडेम इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने ऑक्टोबर 2018 रोजी फेटाळून लावली होती. इथल्या स्थानिकांनी या घरामध्ये संग्रहालय सुरू केल्यापासून गर्दी प्रचंड वाढली आहे आणि त्यांच्या गजबजाटामुळे आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार केली होती. महाराष्ट्र शासनाने कॅमडेमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेल्या आदेशाविरोधात दाद मागण्यासाठी एका लॉ फर्मला नियुक्त केले आहे. या प्रकरणाची सुनावणी 24 सप्टेंबर रोजी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या