सुरांचे गुज

173

<ज्योत्स्ना गाडगीळ>

सुट्टीत आपल्या आवडीच्या विषयांच्या शाळेत जायला मिळाले तर… कौशल इनामदारांच्या कलागुज या संगीत कार्यशाळेविषयी…

संगीत शिकत असताना गुरु आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात, ‘नीट कान देऊन ऐक!’…ऐकणे ही कानाची क्रिया असूनही नीट कान देऊन ऐकणे यात वेगळेपण काय? तर त्या गाण्याचे रसग्रहण करणे. गाणे शिकणाऱया विद्यार्थ्याने गाणे आधी नीट ऐकायला शिकले पाहिजे, ते कसे हे सांगण्यासाठी सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार घेऊन आहे एक संगीत कार्यशाळा, ‘कलागुज’!

‘मी तानसेन नसलो तरी कानसेन आहे!’, असे अनेकजण म्हणतात. याचा अर्थ त्यांना संगिताची उत्तम जाण असते, फक्त गाण्यातले नक्की काय आवडले हे गळ्यातून किंवा शब्दांतून त्यांना नीट सांगता येत नाही. तो व्यक्त होण्याचा आनंद प्रत्येक संगीत रसिकाला मिळावा, हा या कार्यशाळेचा हेतू आहे, असे कौशलजी सांगतात. यासाठी गायक, संगीतकार, वादक, रसिक श्रोता ह्या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.

‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ या गाण्याची मुद्राधून कोणत्या वाद्यावर वाजवली आहे, चित्रपट गीत, भावगीत, मालिका शीर्षक गीत यांच्या निर्मितीत कोणता फरक असतो, तमाशात पेटी का वापरू लागले, गझल आणि गीत यात फरक काय? ‘वद जाऊ कुणाला शरण’ नाटय़गीताची चाल भास्करबुवा बखलेंना कुठे सापडली? अशा अनेक सांगितिक विषयांवर चिंतन करण्याची दृष्टी या कार्यशाळेत मिळू शकते.

‘मराठी अभिमान गीत’, ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’ या संगीत निर्मितीतून कौशलजींनी आपले वेगळेपण नेहेमीच सिद्ध केले आहे. त्यांना ही दृष्टी कोणाकडून मिळाली? याबाबत ते सांगतात, ‘संगीतकार कमलाकर भागवत यांच्यामुळे संगीतकार काय असतो, गाण्याला चाल लावताना त्यामागे कोणता विचार असतो ते कळले. वडील व्यवसायाने वकील असल्यामुळे त्यांच्याकडून तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागली. चेतन दातार यांनी नाटक शिकवले, संगीतात नाटय़ कसे यायला हवे, याची समज दिली. गाण्याला तात्विक बैठक कशी असावी हे सत्यशिल देशपांडे यांच्याकडून शिकायला मिळाले आणि या सर्व गोष्टींचे चिंतन करून संगीताकडे तटस्थपणे बघण्याची दृष्टी मिळाली. मला मिळालेले हे ज्ञान माझ्यापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार व्हावा म्हणून मी विविध विषयांवर कार्यशाळा घेतो. काही ठिकाणी तज्ञ मंडळीही कार्यशाळेत मार्गदर्शनासाठी येतात. कार्यशाळेत मिळणाऱया सूचना विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी कामी येतात.’

दोन-तीन दिवसांतल्या कार्यशाळेत काय हाती लागणार? पण कौशलजी सांगतात, ‘एकदा का सूत्र पाठ केले की जशी गणिते आपोआप सुटतात तशी कार्यशाळेतून मोजकी पण महत्वाची सूत्रे मिळाली की क्लिष्ट वाटणाऱया गोष्टीही सोप्या वाटू लागतात. वेळेचे म्हणाल तर शिकण्यासाठी आयुष्यही कमीच पडते. पण नुसते माहिती गोळा करून उपयोग होत नाही, कलेकडे बघण्याची दृष्टी आधी कमवावी लागते. ती संधी कार्यशाळेत मिळते.

नामवंत कलाकारांना विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्याइतपत वेळ मिळतोच असे नाही, कार्यशाळेत त्यांची पूर्णवेळ उपस्थिती  चालता-बोलता विद्यार्थ्यांना बऱयाच गोष्टी शिकवून जाते. त्यासाठी सजग असणे गरजेचे असते. कोणतीही कला गांभीर्याने शिकली पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा संधी मिळतील, त्याचा अवश्य लाभ घ्या, असेही ते म्हणाले.

कलागूज… संगीतकार कौशल इनामदार

वयोगट…१२ वर्षांवरील सर्वांसाठी

कधी..२९-३० एप्रिल

कुठे ..पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे

संपर्क ..अभिजित ताम्हणे -९८५०५६७५०५

पोवाडे प्रशिक्षण वर्ग (विनामूल्य)..शाहीर हेमंतराजे मावळे

वयोगट..सर्वांसाठी खुला.

कधी..१४ एप्रिल- १ जून

कुठे..न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, ३४५, शनिवार पेठ,पुणे

संपर्क ..९८२२५३१३६६ 

ढोलकी प्रशिक्षण शिबीर..शाहीर अजिंक्य लिंगायत

वयोगट..१५ ते ३५ वर्षे.

कधी..१ ते ३० एप्रिल

कुठे..शिवछत्रपती महाविद्यालय, एन-३, सिडको, औरंगाबाद.

संपर्क..०८६०५७५७३८४ 

संगीत कार्यशाळा..गायिका रेश्मा गोडबोले

वयोगट..८ ते १३ वर्षे

कधी..२१-२२ एप्रिल

कुठे…स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर.

संपर्क..९८६७२७९५७५ 

 

आपली प्रतिक्रिया द्या