संगीतकार उषा खन्ना यांना ‘लता मंगेशकर’ पुरस्कार

603

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने 2019-20 साठीच्या पुरस्कारासाठी उषा खन्ना यांची निवड केली. 7 ऑक्टोबर 1941 रोजी जन्मलेल्या उषा खन्ना या हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील मोजक्या महिला संगीतकारांपैकी आहेत. 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटापासून त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील संगीत खूप गाजले. त्यानंतर ‘बिन फेरे हम तेरे’, ‘लाल बंगला’, ‘सबक’, ‘हवस’, ‘हम हिंदुस्थानी’, ‘आप तो ऐसे ना थे’, ‘साजन बिना सुहागन’, ‘साजन की सहेली’, ‘अनोखा बंधन’, ‘शबनम’, ‘सौतन’, ‘आओ प्यार करे’ यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले व ते खूप गाजले.

1960-1980 या तीन दशकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अनेक नवीन गायकांना गाण्याची संधी दिली. त्यांनी काही मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शन केले. खन्ना यांनी संगीत दिलेली व गायिलेली भजने लोकप्रिय झाली. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिल परदेसी हो गया’ हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. अनोख्या ठेक्यासाठी त्यांची गाणी ओळखली जातात.

आपली प्रतिक्रिया द्या