आम्ही खवय्ये : गोडखाऊ

308

संगीतकार आनंद ओक. रोजच्या डब्यातील आईच्या हातचे गोड पदार्थ आणि रात्री वरण-भात म्हणजे स्वर्गीय आनंद

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – क्षुधा शांती.  म्हणजे अन्न सात्त्विक असेल त्याचा आपलं वर्तनावर परिणाम होतो असं मला नेहमी वाटतं.  

खायला काय आवडतं? – घरी साधंच जेवण असतं, पण मला कधी कधी वेगळं म्हणून चमचमीत खायला आवडतं. वेगवेगळ्या ठिकाणच्या मिसळीची चव मी ट्राय करत असतो. शेवभाजी फार फेव्हरेट आहे. गोड खायला प्रचंड आवडतं. 

 खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?- अजिबात घेत नाही, पण गेल्या दोन-तीन वर्षांत जेवढी जमेल तेवढी जेवणाची वेळ पाळतो. स्टुडियो, तालमी, दौरे यामुळे वेळ पाळणं शक्य होत नाही. यासाठी आई वाटेत खाण्यासाठी बेसन, रव्याचे लाडू, नारळाच्या वड्या देऊन ठेवते.  

डाएट करता का? – शक्यतो पाव आणि मैद्याचे पदार्थ खात नाही.  

कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – माझ्या मामांचं नाशिकला ‘भातुकली’ नावाचं हॉटेल आहे. तिथे खानदेशचे पदार्थ बनवले जातात.  पंधरवड्यातून दोनदा तिकडे जेवतोच.  

कोणतं पेय आवडतं? – उसाचा रस, लस्सी आवडते. वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी प्यायला मला आवडतं. दूध, लोणी, तूप, श्रीखंड असे दुधाचे सगळे पदार्थ मी खातो.  

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – दुपारी हॉटेलमध्ये थांबतो. सोबत कपकेक्स, कणकेची बिस्किट वगैरे सोबत घेऊन ठेवतो.  

स्ट्रीट फूड आवडतं का? – प्रचंड आवडतं. कुठेही गेलो की,  भेळपुरी खाणार हे आधी सांगतो. शेवपुरी, दहीपुरी, पाणीपुरी असे सगळे चाटचे पदार्थ आवडतात.  

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?- आईच्या हातचं वरण-भात. रोज रात्री मी फक्त वरण-भातच खातो. आई मला आठवड्यातून दोनदा डब्यातून रव्याची खीर, शेवयाची खीर, दुधी हलवा, गाजर हलवा असे गोड पदार्थ देतेच.   

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? – पाहुण्यांसाठी उकडीचे मोदक किंवा नारळी पाकातले लाडू करते. मी दाल खिचडी हॉटेलसारखा बनवतो, असे माझे मित्र सांगतात.  

उपवास करता का? – हो. श्रावण, नवरात्र, महाशिवरात्र, आषाढी एकादशी.

पापडाची चटणी

पापड तळून किंवा भाजून घ्यायचा. तेल पूर्णपणे काढून टाकायचं. अगदी कमी तेलाची फोडणी करायची. त्यामध्ये जिरं, हिंग, मोहरीची फोडणी दिली की पापडाचा छान चुरा करायचा आणि वरून घालायचा. छान परतून घ्यायचं. पापड आधीच तळून किंवा भाजून घेतल्यामुळे फोडणी दिल्यावर अजून कुरकुरीत होतो. खरपूस, खमंग सुगंधही त्याला येतो. त्यामध्ये आवडीनुसार तिखटही घालू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या