कोरोनाग्रस्तांची रुग्णालयात म्युझिकल नाईट; रुग्णाने वाजवला गिटार, डॉक्टर बनले सिंगर

कोरोनावर उपचार घेताना रुग्ण आपल्या विरंगुळ्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या मनोरंजनासाठी डॉक्टरांनी चक्क ‘म्युझिकल नाईट’चे आयोजन केले. संगीत देण्यासाठी एका रुग्णानेच गिटार हाती घेतली तर दोन डॉक्टर सिंगर बनले. रुग्णांना धीर देणाऱया, त्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱया आणि आनंद देणाऱया गीतांनी त्यांनी या कार्यक्रमात रंगत आणली.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना उपचारार्थ अनेक दिवस रुग्णालयात राहावे लागते. तिथे डॉक्टर्स, नर्सेस आणि सहरुग्णांशिवाय इतर कुणीही जवळ नसते. इतर रुग्णांना एकमेकांशी गप्पा मारत बसण्याशिवाय दुसरा विरंगुळा नसतो. नागपूरच्या सेव्हन स्टार रुग्णालयात डॉक्टरांनी रुग्णांना मनोरंजनाची संगीतमय पर्याय दिला. संदीप बारस्कर या रुग्णाला गिटार वाजवता येत होते. डॉ. सदाशिव भोळे यांनी त्याला घरून गिटार मागवण्यास सांगितले आणि एका वॉर्डमध्ये म्युझिकल नाईटचे आयोजन केले. या संगीत कार्यक्रमामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया दुसऱया दिवशी रुग्णांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या