मुस्लीम कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेची तत्परता, बाळाचे प्राण वाचवले

1154

आष्टी येथील आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या मुस्लीम समाजातील कुटुंबातील महिलेच्या प्रसूतीनंतर जन्माला आलेल्या अस्वस्थ बाळाचा जीव शिवसेनेच्या धावलेल्या कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे वाचला आहे. शिवसेनेची तत्परता पाहून मातेसह नातलगांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले.

गरीब कुटुंबातील मुस्लीम समाजातील महिलेच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाच्या बचावासाठी शिवसेनेने तत्परता दाखवून धावपळ केल्याने नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात शिवसेनेला यश आले. आष्टी तालुक्यातील धानोरा येथील गरोदर मुस्लिीम महिला प्रसूती वेदना होत असल्याने आष्टी येथील शासकीय ट्रॉमा केअर सेंटर मध्ये दाखल झाली. सोबत सासू सासरे पती देखील होते. महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला खरा, मात्र नंतर डॉक्टरांच्या तपासणीत असे लक्षात आले की, बाळाला श्वास घेण्यास अडचण येत आहे. तसेच त्याची अपेक्षित हालचाल देखील होत नाही. त्यामुळे त्यास पुढील उपचारासाठी काही दिवस काचपेटीत ठेवणे गरजेचे आहे. हा महागडा उपचार करण्यासाठी या कुटुंबाकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. या उपचारांसाठी बाळाला तातडीने नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवणे आवश्यक होते.

मात्र, हे उपचार करण्याएवढी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने अँब्युलन्स देखील करणे शक्य नव्हते. 108 क्रमांकांची गाडी देखील त्यांना उपलब्ध न झाल्याने हे कुटुंब काळजीत सापडले. त्यांनी ही बाब तालुकाप्रमुख कुमार शेळके यांच्या मार्फत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांच्या कानावर घातली. यासंदर्भात त्यांनी तत्परता दाखवून कुटुंबाला घाबरून जाऊ नका असा धीर दिला. तसेच तत्काळ गाडीची व्यवस्था करून या महिलेला तिच्या बाळासह नगर येथील दवाखान्यात रवाना केले. तसेच नगर येथील संबंधित डॉक्टरांना देखील या बाळावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचना केल्याने पुढील उपचार सुकर झाले. शिवसेनेच्या तत्परतेमुळे या बाळाला जीवदान मिळाले.

कठीण प्रसंगी एखाद्या निराधार गरीब कुटुंबासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता बाळासाठी संजीवनी ठरली. बाळाला जीवनदान मिळाले, तर दुसरीकडे बाळाच्या आई वडीलांसह नालगांच्या चेहऱ्यावरून आसंडणाऱ्या त्या क्षणांचा आनंद काही वेगळाच दिसून आला. त्यामुळे हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहणार असल्याचे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. भाऊसाहेब लटपटे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या