मुस्लिम मैत्रिणीसोबत जेवायला गेलेल्या हिंदू तरुणाला जमावाची मारहाण, वाचवण्यासाठी आलेल्या दोघांनाही भोसकलं

मुस्लिम मैत्रिणीसोबत जेवायला गेलेल्या हिंदू तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या दोघा जणांना जमावाने चाकूने भोसकले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक हिंदू तरुण आणि मुस्लिम तरुणी जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. याची माहिती मिळताच मुस्लिम समाजाच्या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. दोघेही जेवण करून बाहेर आल्यानंतर जमावाने त्यांना घेरले आणि नावं विचारली. सदर तरुण हिंदू आणि तरुणी मुस्लिम असल्याचे समजताच 20-22 जणांच्या जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

हिंदू धर्मातील तरुणासोबत जेवायला का गेली? अशी विचारणा करत जमावाने मुस्लिम तरुणीलाही धारेवर धरले. आपण पालकांना सांगून मित्रासोबत जेवायला आल्याचे तरुणीने सांगितले आणि जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही जमावाने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले आणि मारहाण केली. याचदरम्यान जमावातील एकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन जण जखमी झाले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश रघुवंशी यांनी दिली.

दरम्यान, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी भादवि कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सात आरोपींची ओळख पटली असून दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती तुकोगंज पोलीस स्थानकाचे प्रभारी कमलेश शर्मा यांनी दिली. अटक करण्यात आलेले तरुण 23 ते 26 वयोगटातील असून इतर आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

दरम्यान, सदर प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही सदर प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तरुण-तरुणीला त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.