कश्मीर मुद्दय़ावर हिंदुस्थानशी मागील दरवाजाने चर्चा करा! मुस्लिम राष्ट्रांचा पाकिस्तानला सल्ला

1118

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानने अनेक देशांचे दरवाजे ठोठावले परंतु चीनशिवाय कुठल्याही देशाने पाकिस्तानच्या मागणीला भीक घातली नाही. उलट मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला सल्ला दिला. कश्मीर मुद्दय़ावर हिंदुस्थानशी मागील दरवाजाने चर्चा करा. बॅकडोर डिप्लोमसी चॅनेल ऑक्टिव्हेट करा असा सल्ला सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातसारख्या प्रभावशाली मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला, मात्र त्यांनी उलटय़ा बोंबा सुरू केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत जहाल भाषा वापरत असून त्याला लगाम घालण्याची मागणी त्यांनी केली.

पाकिस्तानातील ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार 3 सप्टेंबर रोजी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री अदिल अल जुबैर आणि संयुक्त अरब अमिरातचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन अल नाहयान इस्लामाबादच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांनी काही शक्तिशाली देशांचा संदेश इम्रान खान यांच्यापर्यंत पोहचवला. हिंदुस्थानसोबत कश्मीर मुद्दय़ावर चर्चा करा असे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि सेनाप्रमुख जनरल जावेद बाजवा यांची भेट घेतली.

मोदींविरोधात तोंड बंद ठेवावे

इम्रान खान यांनी कश्मीर मुद्दय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी. कश्मीरमधील काही निर्बंध हटवण्याबाबत चर्चा करावी, मात्र त्यापूर्वी इम्रान खान यांनी मोदी यांच्यावरच्या टीका थांबवाव्यात. त्यांच्या विरोधात तोंड बंद ठेवावे. परंतु मुस्लिम राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा सल्ला इम्रान खान यांनी धुडकावून लावला. आमच्या अटी-शर्ती मान्य केल्या तरच हिंदुस्थानशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली.

 

आपली प्रतिक्रिया द्या