नरेंद्र मोदींबाबत संयम बाळगून बोला; मुस्लीम राष्ट्रांची पाकिस्तानला चपराक

4386

हिंदुस्थानशी असलेला तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने अनौपचारीक चर्चा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला मुस्लीम राष्ट्रांनी पाकिस्तानला दिला आहे. तसेच हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना संयम बाळगावा, त्यांच्यावर असभ्य भाषेत टीका करू नये, असेही मुस्लीम राष्ट्रांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. इमरान यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत संयमाने विधाने करावीत, तणाव वाढतील अशी वक्तव्ये करून नये, असेही मुस्लीम राष्ट्रांनी पाकिस्तानला बजावले आहे.

सौदी अरेबियाचे उपपरराष्ट्रमंत्री आदिल अल जुबैर आणि संयुक्त अरब अमिरातचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन अल नाहयान 3 सप्टेंबरला इस्लामाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी मुस्लीम राष्ट्रांचा संदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना दिला. त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी अनौपचारिक चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न करावेत असा सल्ला इमरान यांना दिला आहे. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यास मुस्लीम राष्ट्रे तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ‘बॅक डोअर डिप्लोमसी’ म्हणजे दोन्ही देशात चर्चेची सुरुवात होणे गरजेचे आहे, यावर भर देण्यात आला. मात्र, चर्चेसाठी पोषण वातावरण तयार करण्यासाठी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत संयमित आणि सभ्य भाषेचा वापर करावा. त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप, असभ्य टीका करणे टाळावे, असे मुस्लीम राष्ट्रांनी पाकिस्तानला बजावले आहे.

मुस्लीम राष्ट्रांनी दिलेल्या प्रस्तावावर अडेलतट्टू भूमिका घेत पाकिस्तानने मुस्लीम राष्ट्रांचा प्रस्ताव नाकारला आहे. कश्मीरमधून कर्फ्यू हटवणे, तेथील निर्बंध काढून घेणे यासह इतर मागण्या मान्य झाल्यावरच हिंदुस्थानशी चर्चा करण्यात येईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान 19 सप्टेंबरला दोन दिवसांच्या सौदी अरबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीवेळी कश्मीरचा मुद्दा पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे. मात्र, पाकिस्तानने मुस्लीम राष्ट्रांचा प्रस्ताव नाकारल्याने या दौऱ्यात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत चर्चा सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या