मुस्लिम बांधवांनी स्वच्छ केली मंदिरे आणि गावे

380

नैसर्गिक अपत्तीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार उडाला. या नैसर्गिक आपत्तीने जाती पातीच्या रेषा तोडून सर्व समाजामधून मदतीचा ओघ सुरू झाला. यात अग्रेसर होती रायगड जिल्ह्यातील जमियेते उलेमा हिंद, श्रीवर्धन ही मुस्लिम संघटना. या संस्थेने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. मुस्लिम बांधवांनी दहा लाखांची आर्थिक मदत गोळा करून जीवनावश्यक वस्तू तसेच औषधोपचार याची मदत केली आहे. मिरज येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या गावातील मंदिरे व गावांची स्वच्छता करून त्यांनी एकतेचा संदेश दिला आहे.

अतिवृष्टीने सांगली, कोल्हापूर, मिरज जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथील जनजीवन उध्वस्त झाले. अनेकांचे संसार बुडाले, जनावरे वाहून गेली. काही जण मृत्युमुखी पडले. कोल्हापूर सांगली मधील पूरस्थिती निवळल्यानंतर या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. घरा घरात चिखल माती साचली तशीच मंदिरे व गावातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात चिखल, कुजलेले धान्य पसरले होते. मुस्लिम बांधवांनी गावातील व मंदिरातील कचरा, चिखल काढून स्वच्छता केली.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील मुस्लिम बांधव कोल्हापूर, सांगली, मिरज भागात मदत घेऊन पोहचले. पूरग्रस्त भागात मदत वाटप करीत असता मिरज मधील एका गावात मंदिराची पुरामुळे दुर्दशा झाली असून देवळात व परिसरात चिखल साचला होता. अशा वेळी मुस्लिम बांधवांनी जाती पातीचा भेद बाजूला सारून मंदीरात साचलेला चिखल काढून टाकून मंदिरे स्वच्छ केली. तर गावातील स्वच्छताही केली.

पुरामुळे येथील जनतेचे संसार उघड्यावर आले असून खाण्यापिण्याचे हाल आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले आहेत. जमियेते उलमा हिंद व अंजुम ने दर्दमंदान म्हसळा- श्रीवर्धन विभाग, तसेच श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील अनेक मुस्लिम जमातीने संघटित होऊन दहा लाखची रक्कम जमा केली गेली. जमियेते उलमा हिंद श्रीवर्धनमधील मुस्लिम संघटनेने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे आले. कोल्हापूर-सांगली, मिरज अशा ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांसाठी टेम्पोद्वारे मोठ्या प्रमाणावर अन्न धान्य व कपड्याचे वाटप करण्यात आले. तर काही पूरग्रस्तांना आर्थिक मदत व डॉक्टरांकडून तपासणीही केली.

जमियेते उलमा हिंद संघटनेचे उपाध्यक्ष मौलाना अमनुल्लाह बुरूड, जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन विभागाचे तालुका अध्यक्ष काजी मोहम्मद हुसेन माहीमकर, मुफ्ती म्हामूद मोमीन, मौलाना मलिक कोतवाल, मौलाना रिहान करदमे, मौलाना हाकीम काळोखे, रिजवान चिविलकर यांनी पुढाकार घेऊन हे कार्य पूर्ण केले.

आपली प्रतिक्रिया द्या