केंद्राने ताब्यात घेतलेल्या जागेतच मशिदीसाठी जागा द्या, मुस्लिम पक्षकाराची मागणी

742

रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांचा दावा फेटाळून लावत त्यांना अयोध्येत पाच एकर जागा द्या, असे आदेश दिले होते. या निर्णयाचे स्वागत देशभरातील मुस्लिमांनी केले, मात्र आता अयोध्येत केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या 67 एकर जागेत ही जागा द्या अशी मागणी या प्रकरणातील मुस्लीम पक्षकाराने केली आहे. त्यांच्या मागणीला अनेक मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर केंद्र सरकारने अयोध्येतील रामजन्मभूमीच्या 2.77 एकर जागा ताब्यात घेतली होती. त्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून रामजन्मभूमीसह 67 एकर जागा ताब्यात घेतली. या जागेतच मशिदीसाठी जागा द्या, अशी मागणी इक्बाल अन्सारी यांनी केली आहे.

‘सर्वोच्च न्यायालय आम्हाला मशिदीसाठी जागा देत असेल तर ती जागा आमच्या सोयीची असायला हवी. केंद्राने ताब्यात घेतलेल्या 67 एकरमधील जागा आमच्यासाठी योग्य आहे. ती देत असाल तरच आम्ही ती घेऊ नाही तर आम्ही ती घेणार नाही. लोक आम्हाला सांगत आहेत की, चौदा कोसाच्या पलीकडे जा आणि तिथे मशीद बांधा तर ते योग्य नाही. म्हणून आम्हाला याच ठिकाणी जागा द्या,’ अशी मागणी अन्सारी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या