तीन तलाक कायद्याविरोधात नांदेडमध्ये मुस्लीम महिलांचे धरणे आंदोलन

18

सामना प्रतिनिधी । नांदेड

केंद्र सरकारने मुस्लीम महिलांच्या हिताच्या नावाखाली मुस्लीम पर्सनल लॉच्या (मुस्लिम व्यक्तीगत कायदा) सर्व नियमांना छेद देत तलाक पध्दतीविरोधात कायदा आणण्याचा प्रयत्न सुरु केल्याने आज या विरोधात नांदेड येथे मुस्लीम महिलांचे विशाल धरणे आंदोलन होते. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुस्लीम मुत्तहेदा महाज या संघटनेने यासाठी पुढाकार घेतला होता.

केंद्रातील मोदी सरकारने मुस्लीम महिलांच्या हिताच्या नावाखाली तीन तलाक पध्दती विरोधी लोकसभेत बिल पारीत केले आहे. राज्यसभेत हे बिल प्रलंबित आहे. या प्रस्तावित कायद्याविरोधात रविवारी (११ मार्च) रोजी नांदेडमध्ये मुस्लीम महिलांचे धरणे आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुस्लीम पसर्नल लॉ बोर्डाच्या निर्देशानुसार देशभरात तीन तलाक पध्दतीविरोधात होत असलेल्या कायद्याला तीव्र विरोध आहे. हिंदुस्थानात या कायद्याविरोधात मुस्लीम महिलांचे प्रचंड मोर्चे आणि धरणे आंदोलन आयोजित केले जात आहेत. या कायद्याबद्दल मुस्लीम महिलांमध्ये रोष असून, हा कायदा मुस्लीम महिलांना कदापीही मान्य होणार नाही.

मूठभर महिलांना सोबत घेवून इस्लाम धर्मातील मूळ शिकवणीच्या विरोधात हा कायदा करण्याचा खटाटोप सुरु असून, केंद्र सरकार तीन तलाक पध्दतीच्या नावाखाली शरीयत कायद्यात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप यावेळी काही महिलांनी व युवतींनी आपल्या भाषणात केला. तीन तलाकच्या प्रस्तावित कायद्याला तीव्र विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लीम महिलांचे विशाल धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी पुतळा ते रेल्वेस्थानकापर्यंत मोठ्या प्रमाणात महिला याठिकाणी धरणेमध्ये सामील झाल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या