चॉकलेट खा … अवश्य!

347

संग्राम चौगुले, [email protected]

फिटनेसबाबत जागरुक असणाऱयांसाठी चॉकलेट वर्ज्य… पण डार्क चॉकलेटचे फायदे असतात… फक्त प्रमाणात खायचे इतकेच…

चॉकलेट खाल्ल्यास आरोग्य चांगले राहाते असा एक समज सगळ्यांमध्येच पसरलेला आहे. वास्तविक चॉकलेट आणि डार्क चॉकलेट हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. यातले डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळेच आरोग्याला फायदा होत असतो. पण ते लक्षात न घेता सगळ्याच प्रकारची चॉकलेट्स स्वास्थ्यासाठी हिताची असं मानलं जातं. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत बघायचं तर डार्क चॉकलेट आवर्जून खायला पाहिजे. डार्क चॉकलेटमुळे ब्लडप्रेशर लेव्हलही कमी होऊ शकते. हृदयाच्या मजबुतीसाठीही डार्क चॉकलेट चांगले असते. मात्र ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच खायचे… डार्क चॉकलेटचे एक किंवा दोन तुकडे खाल्ले तर शरीराला ते फायद्याचे ठरते.

सर्वसाधारणपणे बाजारात मिळणारी चॉकलेट्स आणि डार्क चॉकलेट यातला फरक त्यामधील कंटेंटवरून ठरवला जात असतो. दोन्हीमध्ये चॉकलेट असते हे खरे, पण डार्क चॉकलेटमध्ये कोका या फॉर्ममध्ये बनवले जाते. मिल्क कंटेंट त्यामध्ये नसतोच. बाकी डेअरी मिल्क चॉकलेट वगैरे असतात त्यात प्रामुख्याने दुधाचा वापर केलेला असतो. या प्रकारच्या उत्पादनांना ‘मिल्क प्रॉडक्ट्स’ म्हटलं जातं. त्यामुळे दूध असलेली चॉकलेट्स खाल्लीत तर शरीरासाठी ती जास्त फायद्याची ठरत नाहीत.  कारण त्यात कॅलरीज मोठय़ा प्रमाणावर असतात आणि डार्क चॉकलेटच्या तुलनेत ते शरीरासाठी आरोग्यदायी नसतात. पण साधारणपणे चॉकलेट प्रकृतीसाठी चांगलं असं एकाने म्हटलं तर सगळेच म्हणायला लागतात. पण चॉकलेट कोणत्या प्रकारचे खाल्ले तर त्याचा शरीराला फायदा होतो ते माहीत असणं फार गरजेचे आहे. शक्तीची मात्रा कमी झाली असेल तर साधे चॉकलेट खाऊन ही शक्ती भरून येणार नाही. पण त्याचवेळी जर डार्क चॉकलेट खाल्लेत तर ही शक्ती नक्की भरून निघेल. म्हणूनच एकदा चॉकलेट आणि डार्क चॉकलेट यातला फरक समजला की त्या प्रत्येक चॉकलेटचे फायदे-तोटे नीट कळू शकतात.

चॉकलेट खायला सगळ्यांनाच आवडतं. पण जास्त गोड खाणं चांगलं नाही या विचारामुळे काहीजण जास्त चॉकलेट खात नाहीत. अशा लोकांनी एका मर्यादेत डार्क चॉकलेट खायला काहीच हरकत नाही. डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियमचंही प्रमाण बऱयापैकी असते. हे मॅग्नेशियम शरीराला बाहेरून आपण कुठून घेऊ शकत नाही. ते डार्क चॉकलेटमधून आपल्याला मिळतं. डाएट किंवा हेल्दी प्रॉडक्ट्स म्हणून खाताय की आवड म्हणून हे आधी ठरवायला पाहिजे. डाएटसाठी खायचे तर डार्क चॉकलेट उत्तम. नाहीतर बाजारात मिळणारे कुठलेही मिल्कबेस्ड चॉकलेट खाऊ शकता.

भरपूर ऍण्टी ऑक्सिडेंटस्…

डार्क चॉकलेट काळ्या रंगात असते आणि ते कोका-बटरपासून बनवतात, तर बाजारात मिळणाऱया साध्या चॉकलेट्समध्ये दूध असते. डार्क चॉकलेटचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ऍण्टी ऑक्सिडेंट्स जास्त असतात. त्यामुळे त्यात शुगर लेव्हलही कमी असते. शरीराच्या दृष्टीने जास्त शुगर ही विषासमान असते. चॉकलेट फक्त गोड पदार्थ म्हणून खाता येईल. पण फिटनेससाठी चॉकलेट चांगले असते ते डॉर्क चॉकलेट. ते गोड लागत नाही. पण आरोग्यासाठी तेच चांगले ठरते.

 

आपली प्रतिक्रिया द्या