माझ्या मिश्या, माझी शान! मिशीवाली शायजा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली

सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या धाडसाची चर्चा सुरू आहे. कारण, या महिलेच्या चेहऱ्यावर मिश्या आहेत. या महिलेला सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

या महिलेचं नाव शायजा असं असून ती केरळच्या कन्नूर जिल्ह्यात राहते. आधी शायजाच्या ओठांवर सर्वसाधारण लव होती. पण, अपर लिप्स थ्रेडिंग (ओठांच्या वरची लव धाग्यांच्या साहाय्याने काढून टाकणे) न करता तिने ती लव तशीच वाढू दिली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत तिच्या ओठांवर मिश्यांएवढे मोठे केस दिसू लागले.

वास्तविक, शायजा आता पस्तिशीची असली तरी गेली अनेक वर्षं विविध समस्यांना तोंड देत आहे. गेल्या 10 वर्षांत तिच्यावर 6 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. एका शस्त्रक्रियेत स्तनांतून गाठ काढण्यात आली तर दुसऱ्या शस्त्रक्रियेत गर्भाशयातून गाठ काढण्यात आली. पाच वर्षांपूर्वी तिचं गर्भाशय काढून टाकण्यात आलं. या त्रासानंतरही शायजा आपल्या आयुष्यात खूप खूश आहे.

त्यानंतर तिला मिश्यांचं थ्रेडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. पण, तिने कधीच थ्रेडिंग केलं नाही. त्यामुळे तिला बऱ्याचदा मस्करीला, कुत्सित टोमण्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, तिला त्याची आता सवय झाली आहे. उलट ती आता आपल्या मिश्या अभिमानाने मिरवते.