‘निकाहा’साठी त्याने रचला वडिलांच्या आजाराचा बनाव, अॅम्ब्युलन्समधून केला दोनशे किमीचा प्रवास

1007

देशभरात लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्न पुढे ढकलली आहेत. तर अनेकांनी घरच्यांच्या उपस्थितीत घरातच लग्न केले आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एका उतावळ्या नवऱ्याने अॅम्ब्युलन्समधून मुझफ्फरनगर ते दिल्ली असा दोनशे किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यानंतर त्याच अॅम्ब्युलन्समधून तो पत्नीला दिल्लीवरून परत देखील घेऊन आला. या प्रकरणी त्या तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना तसेच मुलीच्या माहेरच्या मंडळींना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

अहमद असे त्या तरुणाचे नाव असून त्याचा दिल्लीतील एका तरुणीशी निकाह होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचा निकाह होणं शक्य नव्हतं. जिल्हाबंदी असल्यामुळे अहमदला दिल्लीला जाणे शक्य नव्हते. मात्र अहमदला त्याचे लग्न पुढे ढकलायचे नव्हते. त्यामुळे सर्वात आधी त्याने अपर गंगा कनाल रोडवरून छुप्या मार्गाने दिल्लीत जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवले व परत पाठवले. त्यामुळे अहमदने त्याच्या वडिलांच्या आजाराचा बनाव रचला. एका डॉक्टरकडून त्याने खोटे मेडिकल सर्टिऱफिकेट बनवले व त्यानंतर तो त्यांना अॅम्ब्युलन्समधून घेऊन दिल्लीला गेला. तिथे निकाह करून चार पाच दिवसांनी त्याच अॅम्ब्युलन्सने तो मुझफ्फरनगर मधील खतौली नगर येथे परतला. मात्र त्याच्या शेजारच्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अहमदची चांगलीच खबर घेत. त्यांना क्वारंटाईन केले आहे. अहमद व त्याच्या नववधूच्या कुटुंबांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. तसेच अॅम्ब्युलन्सचा चालक मेहताब याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या