गोहत्याप्रकरणी २ अल्पवयीन मुलींना पोलिसांनी जेलमध्ये पाठवलं

सामना ऑनलाईन । मुजफ्फरनगर

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये पोलिसांनी गोहत्येच्या प्रकरणात २ अल्पवयीन मुलींची कारागृहात रवानगी केली आहे. या मुलींच वय १२ वर्ष आणि १६ वर्ष आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलींची आई आणि इतर ६ जणांना अटक केली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार या दोन्ही मुलींना पोलिसांनी न्यायालयात सज्ञान म्हणून हजर होतं आणि त्यामुळे न्यायालयानं त्यांना कारागृहात पाठवलं.

या दोन्ही मुलींना बालसुधागृहात पाठवणे गरजेचे होते. मात्र ज्यावेळी या मुलींचे आधारकार्ड पाहिलं त्यावेळी एका मुलीचा जन्म २००१ तर दुसऱ्या मुलीचा जन्म २००५मधील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या मुली अल्पवयीन असल्याची बाब समोर आल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली. शुक्रवारी (२९ डिसेंबर) पोलिसांनी मुजफ्फरपूरमधील दोन घरांवर छापे टाकले होते. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोमांस जप्त केलं. तसेच ५ महिलांसह एकूण ९ जणांना अटक केलं होतं.

उत्तर प्रदेशमध्ये गोहत्येवर बंदी आहे. त्यामुळे या गोहत्येप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आलं आहे. चार आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. न्यायलयानं अटक केलेल्या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र या अल्पवयीन मुलींनाही कारागृहात पाठवल्यानं पोलिसांवर टीका होत आहे. खरंतर या अल्पवयीन मुलींना बालसुधारगृहात पाठवले पाहिजे होते. या घटनेनंतर मात्र नागरिकांनी आंदोलन सुरू केल. तसेच ‘पोलिसांनी अल्पवयीन मुलींना अटक कशी केली?’ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.