
भाजपकडून केले जाणारे फोडाफोडीचे आणि सुडाचे राजकारण, शिंदे गटाची गद्दारी महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडलेली नाही हे इंडिया टुडे-सी वोटरच्या ताज्या सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या निवडणुका कधीही होऊ द्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीला 48 पैकी दणदणीत 34 जागा मिळतील. तर, भाजपा-शिंदे गटाचा धुव्वा उडेल असे या सर्व्हेत स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच कोरोनासारख्या भयंकर महामारीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे हे नेहमीच टॉप-5 मध्ये राहिले. मात्र, एकनाथ शिंदे यांची कामगिरी सुमार असून त्यांचा क्रमांक 8 व्या स्थानी आहे. शिंदेंना अवघे 2.2 टक्के मते मिळाली.
इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी देशाच्या जनतेचा राजकीय मुड काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘मुड ऑफ नेशन’ हा सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये आज लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात आणि राज्यांमध्ये काय स्थिती राहील? मोदी सरकारची कामगिरी आदी प्रश्न सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आले. महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांची सुमार कामगिरी
कोरोना काळात ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हेत टॉप 10 मुख्यमंत्र्यांची यादी कायम चर्चेत असायची. या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सातत्याने टॉपच्या क्रमांकावर असायचे.
यावेळी टॉप 10 मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदेंचा 8 वा क्रमांक आहे आणि त्यांना केवळ 2.2 टक्के लोकांची पसंती आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 39.1 टक्के मिळवून प्रथम क्रमांकावर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 16 टक्के मिळवून द्वितीय त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (7.3 टक्के), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (7 टक्के), ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (5 टक्के) हे लोकप्रिय आहेत.
महाराष्ट्रात असे असेल चित्र
महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाचे सरकार आहे. जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडले नसून या सरकारवर जनता पूर्णपणे नाराज असल्याचे सर्व्हेत स्पष्ट झाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. भाजपला 23 आणि शिवसेनेला 18 अशा 41 जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्ये राष्ट्रवादीला 4 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. मात्र, आता भाजप-शिंदे गटाला जनतेने नाकारले आहे. फोडाफोडीचे आणि सुडाचे राजकारण पसंत पडलेले नाही हे स्पष्ट होते.
लोकसभेची निवडणूक झाल्यास राज्यात 48 जागांपैकी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला 34 जागांवर विजय मिळेल. म्हणजे उर्वरित केवळ 14 जागा भाजप-शिंदे गटाला मिळतील.
देशात पुन्हा भाजप-मित्रपक्षांच्या एनडीएचे सरकार येईल, असे सर्व्हेत म्हटले आहे. एनडीएला 298 जागा, काँग्रेस-मित्रपक्षांच्या यूपीएला 153 आणि अन्य पक्षांना 92 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला 43 टक्के, यूपीएला 29 टक्के, अन्य पक्षाना 28 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, बिहारमध्येही भाजपला झटका
महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपला मोठा झटका बसेल. कर्नाटकातील लोकसभेच्या 28 जागांपैकी काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) यूपीएला 17 जागा मिळतील. 2019 ला यूपीएला फक्त 2 तर भाजपच्या एनडीएला 26 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपला केवळ 11 जागा मिळतील.
बिहारमध्ये 2019 ला भाजपची नितीशकुमार यांच्या जदयुसोबत आघाडी होती. त्यामुळे एनडीएला 40 पैकी 39 जागा मिळाल्या होत्या. आता नितीशकुमार आणि राजदचे तेजस्वी यादव यांचे आघाडी सरकार आहे. त्यामुळे आता निवडणूक झाल्यास जदयु-राजद-काँग्रेस यूपीएला 25 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे.
बेरोजगारी, महागाई हे मोदी सरकारचे सर्वांत मोठे अपयश
या सर्व्हेत 25 टक्के लोकांनी महागाई हे मोदी सरकारचे सर्वांत मोठे अपयश असल्याचे म्हटले आहे. 17 टक्के लोकांनी बेरोजगारी, 8 टक्के लोकांनी कोरोनाशी लढा तर आर्थिक विकास हा मुद्दा 6 टक्के लोकांनी मोदी सरकारचे मोठे अपयश म्हटले आहे.