दोस्त माझा मस्त

310

संजीवनी धुरी-जाधव

उद्या मैत्रीचा दिवस. मैत्री या सहज, सुंदर नात्याला कसलेच बंधन नसते…  ना वयाचे… ना कशाचे… ललित प्रभाकर आणि विद्याधर जोशी दोघेही एकाच क्षेत्रातील… पण वय… अनुभव दोन्हींत भरपूर अंतर…. पण हे अंतर त्यांच्या मैत्रीने अगदी सहज पार केलंय…

ललित प्रभाकर …. विद्याधर जोशी हे माझे खूप चांगले मित्र. स्टार प्रवाहच्या ‘जिवलगा’ मालिकेत आम्ही एकत्र काम केले तेव्हापासूनची आमची गाढ मैत्री. आमच्या वयामध्ये जरी अंतर असले तरी ते कधी त्यांनी मला जाणवू दिले नाही.

मी कुठलीही गोष्ट त्यांच्याशी शेअर करू शकतो किंवा कुठलीही गोष्ट ते हक्काने मला बोलू शकतात एवढी आमची घट्ट मैत्री आहे. काही माणसे असतात ज्यांच्यासमोर आपल्याला काही सिद्ध करावे लागत नाही असे व्यक्तिमत्त्व म्हणजे विद्याधर जोशी. शूटिंगमुळे आमचे फारसे भेटणे होत नाही. पण जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा फारच गप्पा मारतो. काही चुकीचे वाटले तर तेवढय़ाच हक्काने सांगतात. त्यामुळे त्यांचा परखडपणा, कोणाशीही जुळवून घेण्याचा स्वभाव मला फारच भावतो. आम्ही फोनवरून सतत संपर्कात असतो. कधी ते माझ्या घरी येतात, कधी मी त्यांच्या घरी जातो. आम्ही ‘टीटीएमएम’ चित्रपट केला तेव्हा आम्हाला एकत्र वेळ घालवता आला. खूप धमाल केली. त्यात त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका केली होती.

‘जीवलगा’ मालिकेच्या शूटिंगला ते बाईकने यायचे. आमचा रोजचा दिनक्रम पॅकअप झाल्यावर ते मला बाईकने सायन स्टेशनला सोडायचे. एखाद्या तरुण मुलाला लाजवतील अशी बाईक ते चालवतात, पण त्यांची रायडिंग मी एन्जॉय करायचो. आमच्या मैत्रीला किती वर्षं झाली ते माहीत नाही. पण जेव्हापासून एकमेकांना ओळखतो तेव्हापासून एकत्र आहोत.

बरीच नाटके, सिनेमे करत असताना त्यांनी त्यांचा जॉबही सांभाळला त्याचे खरेच कौतुक वाटते. विद्याधर जोशींना एवढेच सांगावेसे वाटते, तुम्ही आहात तसेच राहा. आपली मैत्री अशीच कायम राहो.

मैत्रीला वयाचे बंधन नाही – विद्याधर जोशी

ललित हा माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे. ‘जीवलगा’ या मालिकेपासून त्याची आणि माझी ओळख. त्यात त्याने माझ्या पुतण्याचा रोल केला होता.

ललित कल्याणला राहायचा आणि मी चेंबूरला. त्यामुळे मी त्याला रोज मढवरून सायन स्टेशनला सोडायचो. त्या दरम्यान आमची छान मैत्री जमली. त्याच्यासोबत काम कराताना मजा यायची. तो मला फार ज्युनिअर होता,  तो कष्ट करणारा मुलगा आहे. त्याच्या कामातून ते दिसत होते म्हणून मी त्याच्या कामात त्याला नेहमी प्रोत्साहन द्यायचो. त्यानंतर आम्ही खूप गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत गेलो. त्याच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीमध्ये तो काय करतोय कसे करतोय, त्याच्या काय समस्या आहेत, हे सगळे आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. त्याचे काही चुकीचे वाटले असेल तर ललित हे तुझे फारसे बरे झाले नाही असा सल्लाही देतो.

ललित चांगला श्रोता आहे. तो लॉजिकली आपल्यासोबत बोलू शकतो असे मला वाटते. माझे काही त्याला पटले नाही तर तो मला तसे सांगू शकतो आणि माझं म्हणणं त्यावर काय आहे हे ऐकून घेऊ शकतो. आमच्या वयामध्ये जरी कितीही अंतर असले तरी आमची मैत्री अबाधित आहे. काहीवेळेला आम्ही महिनाभर एकमेकांशी बोलतसुद्धा नाही. पण महिन्याभराने भेटल्यावर आम्ही महिन्याभराच्या गप्पा मारत बसतो.  आम्ही शूटिंगला सकाळी आलो की, ललित म्हणायचा ‘एक्सेल वर्ल्ड में रहूंगा मैं, बाप्पा के साथ जाऊंगा मैं! तो माझ्या घरी कधीतरी येतो, मी त्याच्या घरी कधीतरी जातो, कधी हॉटेलमध्ये जातो.

ललित, माझ्या स्वभावातल्या दुर्गुणांचाही तू कधीतरी क्षमापूर्वक विचार कर, जसे मी तुझ्या करतो. मैत्री दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.

 

आपली प्रतिक्रिया द्या