माझ्या शिक्षणाचा राडा

203

<< टिवल्याबावल्या >> शिरीष कणेकर

शिक्षक – तू शाळेत का येतोस?

विद्यार्थी – मी येत नाही. मला पाठवतात.

बरोबर आहे, पण याला विनोद का म्हणतात? तो ‘व्हॉटस् अॅप’वरून एकमेकांना का पाठवायचा असतो? तो वाचून नेमकं कोणाला हसू फुटतं? मुळात हसण्यासारखं त्यात काय आहे? ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून भाषण’ यात एकवेळ काहीतरी विनोद शोधता येईल. विजय मल्ल्यावर बँकांकडून कारवाई यातही दडलेला विनोद हुडकून काढता येईल. पण ‘मी शाळेत येत नाही. मला पाठवतात.’ यात कसला आलाय विनोद? उलट या देशात बालवयापासून अत्याचार कसे सुरू होतात याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. जनावरांसाठी पांजरपोळ तशी मुलांसाठी शाळा. शाळेत शिक्षण मिळत नाही. शाळेत जे मिळतं त्याला शिक्षण म्हणायचं असतं.

आमचे चित्रकलेचे शिक्षक भजीवर फितले जायचे. म्हणजे त्यांना गरमागरम, कुरकुरीत कांदाभजी दिली की ते परीक्षेत काठावर का होईना पास करायचे. एकदा चेकाळून त्यांनी भजीच्या पुडीचं चित्र फळय़ावर काढलं होतं.

‘‘सर, पुडी कळली पण आत भजीच असतील कशावरून?’’ मी विचारले.

माझ्या शंकेनं बावरून जाऊन सर पुडी उघडायला फळय़ाकडे धावले होते. पुढे पुढे त्यांनी वर्गात प्रवेश केला की आम्ही एकमुखानं ‘भजी-भजी’ असे ओरडायचो. असा ‘भजीबाज’ मी दुसरा पाहिला नाही. लोक मदिरेचे भक्त असतात. आमचे सर ‘चकणा’ भजीचे आशिक होते. जो बात भजीमे है वो शराब में कहाँ? वर्गातल्या मुलीदेखील ‘भजी-भजी’ असं ओरडायला लागल्या की ती संधी साधून आम्ही त्यांच्याकडे (खरं म्हणजे एकीकडेच) डोळे भरून बघून घ्यायचो. भजीच्या काल्पनिक घमघमाटात तिच्या सौंदर्याचा दरवळ मिसळून जात असे. आजही भजी समोर आली की ती आठवते. (सध्या ती काय करते?) मी भजीचा मलिदा चारून परीक्षेपुरतंही सरांना वश करू शकलो नाही. कारण माझी चित्रकला त्याच दर्जाची होती. मी चितारलेली शिडी तिरडीसारखी दिसली तरी त्यात मी माझं उत्तुंग यश मानायचो. एकदा माझा घोडा टेबलासारखा आला होता. म्हटलं टेबल काढावं; त्याचा घोडा होईल. पण तसं झालं नाही. मी काढलेल्या टेबलाला सर सुरवंट समजले. हीच चित्रकला पुढे ‘अॅबस्ट्रक्ट आर्ट’ म्हणून ओळखली जायला लागली. सरांच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून भजीच ठेवली असेल काय?…

आम्हाला इंग्रजी शिकवायला बुजुर्ग गुप्ते सर होते. ते सँडलच्या आत मोजे घालत. वृद्धापकाळामुळे असेल कदाचित. ते टांग्यातून शाळेत येत. त्यांना मी अजिबात आवडायचो नाही. (कोणाला आवडायचो म्हणा!) मला चेचण्याची एकही संधी ते सोडत नसत. ते शिकवायचे इंग्रजी, पण चेचायचे मराठीतून. गुप्ते म्हणजे आपल्यापैकी असं मला वाटायचं. पण त्यांना तसं मुळीच वाटायचं नाही. त्यांच्या लेखी ते मांजर व मी उंदीर होतो. ते मला खेळवून खेळवून मारत. गुप्तेसरांमुळे इंग्रजी हा माझा आवडता विषय नावडता झाला. त्यांना इंग्लंडला पाठवलं असतं तर अवघा देशच इंग्रजीचा तिरस्कार करू लागला असता. नशीब टांगा मालेगावातून इंग्लंडला जात नव्हता.

सोनवणे सर आम्हाला सायन्स शिकवायचे. आम्ही मुळात शिकण्यासाठीच शाळेत येत नसल्यामुळे आम्ही काही शिकायचो नाही. त्यातून आम्हाला सोनावणे सरांचं शिकवणं कळायचंही नाही. त्यामुळे सरांच्या शिकवण्यानं आपण चुकून काही शिकू अशी धास्तीही नसायची. ते अधूनमधून केव्हातरी एक दिवस इंग्रजीतून शिकवायचे. त्यांची हौस आमच्यावर भागवायचे. त्यांना बहुतेक प्राध्यापक व्हायचं असणार. ते काही झेपलं नाही. मास्तरकी नशिबी आली. आम्ही होतोच वेठबिगार. ते इंग्रजी झाडायचे. ते जर्मनमधून किंवा फ्रेंचमधून किंवा चिनीतून शिकवत असल्यागत आम्ही निर्विकार बसायचो. शर्वरीकडे बघायला हा वेळ कामी यायचा. आणखी कोण कोण बघतोय तेही बघता यायचं. स्पर्धकांच्या ताकदीचा अंदाज यायचा. त्यामुळे ‘आज मी इंग्रजीतून शिकवणार’ असं सोनावण्यांनी म्हटलं की आमच्या अंगातून आनंदलहरी दौडायच्या. तो आनंद चेहऱ्यावरही दिसत असावा. आपल्या इंग्रजीतून शिकवण्याला ही उत्स्फूर्त दाद आहे असं सोनावणेसरांना वाटायचं. जास्तच चेव येऊन ते त्यांच्या इंग्रजीला धार काढायचे. माझ्या मनात यायचं की, गुप्ते सरांना आणून बसवावं. ज्याला सोनवणेसरांचे इंग्रजी कळेल असा एखादा तरी वर्गात असू दे. त्यांना इंग्रजी कळलंही असतं, पण सायन्स कसं डोक्यात शिरणार? तिथं त्यांची आणि आमची पातळी एकच होती. मोज्यावर सँडल घातली, टांग्यातून शाळेत आलं व मला पाण्यात पाहिलं एवढ्यामुळे सायन्स थोडंच येतं? एकदा ‘लॅब’मध्ये अपघातानं सोनावण्यांच्या डोळ्यांत कसलं तरी ऑसिड उडालं, डोंब उसळला. सोनावणे सरांनी किंचाळून आमच्या कानठळ्या बसवल्या. ते इंग्रजीतून किंचाळतायत की मराठीतून हे विचारण्याचा मोह प्रसंगाचं  गांभीर्य पाहून मी दाबून ठेवला. सर सॉलीडच ‘टरकीफाय’ झाले होते.  अख्ख्या शाळेला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याआवाजात सोनावणे सर विलाप करीत होते. आकाशातून उडत जात असलेल्या नारदमुनींच्या वीणेवरची फुलांची नाजूक माळ त्याहून नाजूक असलेल्या राणी इंदूमतीच्या अंगावर पडून त्या अपघातानं व मारानं तिचं निधन झालं. त्यावर अज राजानं केलेला विलाप हा पुराणात ‘अज-विलाप’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर नंबर लागतो तो ‘सोनावणे-विलापा’चा! ‘मला वाचवा रे, मी आता वाचत नाही. मी मरतोय- माझी बुबुळं बाहेर येतायत. मला लहान लहान मुलं आहेत. त्यांची फी भरायचीय-बायकोला साडी आणतो म्हणून सांगितलं होतं. आता मी मेल्यावर तिला कोणीतरी आणा. ती चिडली ना तर माझा जीव घेईल… ‘डोळ्यांनी त्यांना स्वच्छ दिसायला लागेपर्यंत त्यांचं हे आक्रंदन चालू होतं. पण सर खडखडीत बरे झाल्यावर (व इंग्रजीतून शिकवायला लागल्यावर) माझ्या वर्गातल्या विंचुरेनं गुरुपत्नीला साडी घेऊन द्यायचं काहीच कारण नव्हतं. संतापानं सोनावणेसर ते अॅसिड ‘आय ड्रॉप’सारखं डोळय़ांत घालून घेतील, अशी मला भीती वाटली होती.

माझी शाळा सुटल्यावर (होय, मी चक्क एसएससी पास झालो. त्याची चौकशी पण झाली. त्यातूनही संशयाचा फायदा मिळून सुटलो.) चित्रकलेचे सहस्रबुद्धे सर, इंग्रजीचे गुप्ते सर, सायन्सचे सोनवणे सर, भूगोलाचे बागवडे सर, इतिहासाचे महाजनी सर, मराठीच्या साठे मॅडम, गणिताचे आठल्ये सर, नागरिकशास्त्राचे जोशी सर, आनंदानं फुगड्या व झिम्मा खेळून वाचले. प्रिन्सिपॉल तुपे सरही त्यांच्या ऑफिसात खुर्चीतल्या खुर्चीत नाचले म्हणे. पण गुप्ते सरांच्या टांग्याच्या घोड्यानंही नाचावं हे मात्र जरा जास्तच झालं…

 [email protected]

 

 

आपली प्रतिक्रिया द्या