700 होर्डिंग, 3 हजार बसस्टॉपवर, 3500 बेस्टवर झळकणार; पालिकेची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ची जोरदार जनजागृती

कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम घराघरात राबवायला सुरुवात केली असताना मुंबई महानगरपालिकेने ‘एक वचन, तीन नियम : मास्क वापरा, हात धुवा, अंतर ठेवा!’ अशी जोरदार जनजागृती करायला सुरुवात केली आहे. या जनजागृती मोहिमेतंर्गत 700 हार्ंडग, 3 हजार बसस्टॉपवर, 3500 बेस्टवर जाहिराती झळकणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि कर्मचारी तसेच पोलीस, डॉक्टर, आरोग्यसेवक, बेस्ट कर्मचारी धोका पत्करून आपापले कर्तव्य बजावत आहेत. कोरोना योद्धय़ांकडून अहोरात्र कर्तव्य पालन सुरू असतानाच कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. यात प्रत्येक घराघरात दोन वेळा तपासणी करून कोरोनाला आळा घातला जाणार आहे. राज्य सरकारची ही मोहीम प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचावी, यासाठी पालिकेने मुंबईतील रस्त्यांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये हार्ंडग उभारली असून यात मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरण्याचे आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे त्याचबरोबर घराबाहेर आणि घरात परतल्यानंतर वेळोवेळी हात धुवा, असे आवाहन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’या जनजागृती मोहिमेतून करण्यात येत आहे. अशा प्रकारची ‘एक वचन, तीन नियम’ असलेली 700 हार्ंडग संपूर्ण मुंबईत उभारली जाणार आहेत. त्याचबरोबर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या 3500 बेस्टवर आणि विविध परिसरातील 3 हजार बसस्टॉपवर ‘एक वचन, तीन नियम’ ही जाहिरात झळकणार आहे.

कोरोनाविरोधातील युद्ध नक्की जिंकू! – आयुक्त

कोरोनाविरोधात सुरू असलेले युद्ध आपण नक्कीच जिंकू, यासाठी मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना नियमांचे पालन करावे तसेच पालिकेला आणि पालिकेकडून वेळोवेळी केल्या जाणाऱया आवाहनांना प्रतिसाद द्यावा. मुंबईकरांच्या सहकार्याने कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण नक्कीच जिंकू, असा विश्वास पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या