मी पुन्हा… वनांतरी

105

<< भटकेगिरी >>    <<   द्वारकानाथ संझगिरी >>

गोरे शोमनशिप, मार्केटिंगच्या बाबतीत भयंकर हुशार आहेत. आपण त्यांच्या गुडघ्यापाशीही नाही. चांगली वस्तू आकर्षक पॅकिंगमध्ये अद्भुत कशी करायची याची प्रचंड जाण त्यांना आहे. अनेक जागतिक उदाहरणं मी देऊ शकतो, पण याक्षणी फक्त दोनच देतो. केर्न्सचं रेन फॉरेस्ट आणि  बॅरिअर रीफ. यावेळी रेन फॉरेस्टबद्दल बोलूया.

रेन फॉरेस्ट दोन प्रकारचे असतात. एक ट्रॉपिकल, दुसरं टेंपरेट. केर्न्सजवळचं रेन फॉरेस्ट डेण्ट्री किंवा कुरांडा ही ट्रॉपिकल प्रकारची आहेत. उष्ण, दमट हवामान आणि भरून पाऊस (८०-१०० इंचांच्या आसपास) या वातावरणात तयार झालेली. जगातल्या प्राण्यांच्या आणि झाडांच्या प्रजातींपैकी पन्नास टक्के प्रजाती या रेन फॉरेस्टमध्ये सापडतात. जंगलाच्या एक हेक्टर भागात तुम्हाला बेचाळीस हजार प्रकारचे कीटक सापडू शकतात किंवा ३१३ प्रजातींची आठशेसात झाडे सापडू शकतात. केवढं वैशिष्टय़ आहे याचा विचार करा! म्हणून या जंगलांना जगातील सर्वात मोठी फार्मसी असं म्हटलं जातं. इतकी नैसर्गिक औषधं तिथे सापडली आहेत. जगातल्या कदाचित सर्वात मोठय़ा आणि  कीर्र म्हणतो तशा ऍमेझॉनच्या जंगलाचा एक छोटासा भाग मी गयानाला गेलो होतो तेव्हा पाहिला होता. भयाण वाटावं असं ते जंगल होतं. त्यात ऍनाकोंडा, जॅग्वारसारखे प्राणी असतात. आम्ही ज्या ‘कैतूर फॉल’च्या भागात गेलो होतो तिथे हे हिंस्र प्राणी नव्हते, पण ‘पराधीन आहे पुत्र मानवाचा’ ही भावना त्या जंगलात शिरल्यावर येते. कुरांडाचं जंगल थोडंफार कीर्र वाटलं तरी भयाण नाही वाटत. हुशार ऑस्ट्रेलियन्स तुमच्या खिशात हात घालून हे जंगल वरून आणि जमिनीवरून दाखवतात. ते केबल कारला स्कायरेल म्हणतात. ही साडेसात किलोमीटरची आहे. वाटेत दोन स्टेशनं. ती जंगलातल्या उंच उंच झाडांच्या शेंडय़ावरून त्यांना गुदगुल्या करत तरंगत चाललीय असं वाटतं. स्कायरेलच्या डायमंड क्लासमध्ये तळ काचेचा असतो.  त्यामुळे झाडाच्या शेंडय़ावर बसलायत असा तुम्हाला फील येतो. ती झाडं किती उंच असतात याची कल्पना आहे का? त्याला जंगलाचं ‘इमर्जंट लेयर’ असं म्हणतात. सत्तर ते ऐंशी मीटरची झाडं त्यांचं डोकं (ज्याला आपण शेंडा म्हणतो) सूर्याच्या शोधात उंचावून उभी असतात. म्हणजे साधारण २५ मजल्यांच्या इमारतींचा कॉम्प्लेक्स वाटू शकेल एवढी ही झाडं उंच असतात. त्याचा खालचा जो जंगलाचा ‘लेयर’ असतो, त्याला कॅनॉपी लेयर म्हणतात. तो जमिनीपासून ३० ते ४५ मीटरवर असतो. कॅलिडोस्कोपमधल्या नक्षीप्रमाणे झाडांचे झेंडे एकमेकांत गुंफलेले असतात. त्यातून खाली फक्त पाच टक्के सूर्यप्रकाश झिरपतो. ते नक्षीदार हिरवं छत स्कायरेलमधून अफलातून दिसते. हिरव्या रंगालाही वेगवेगळ्या शेड्स असतात. गडद हिरवा, पोपटी हिरवा, हिरव्या चुडय़ाचा हिरवा! तिथे जंगल सर्वात घनदाट वगैरे असतं. त्याच्या खालच्या पातळीवर सूर्यप्रकाश फारसा पोहोचत नसल्याने तिथे कमी सूर्यप्रकाशात  जगणारी खुरटी झाडं तेवढी असतात. त्यामुळे स्कायरेलमधून फिरताना आपण जंगलाचा ‘क्रिमी लेयर’ पाहत असतो. खाली दारिद्रय़रेषेखालच्या सूर्यप्रकाशात वाढलेली झाडं दिसतात. ही जगातली सर्वात लांबलचक स्कायरेल आहे. ती जंगल दाखवताना दूरवरची स्वप्नातली गावं आणि मयूरपंखी समुद्र दाखवते.

जी स्टेशनं आहेत ती अशासाठी केली आहेत की, तिथून उतरून झाडांच्या मुळाशी किंवा मध्यावर फिरता येतं आणि दरीच्या काठावर उभं राहून दरीचं विहंगम दृश्य पाहता येतं. दोन स्टेशनांपैकी बॅरॉन फॉल्सचं (धबधबा) दृश्य अतिशय सुंदर आहे. डोंगरावरून कोसळणारं पाणी नेहमीच सुंदर दिसतं. हा धबधबा वरून पाहताना जिथे छोटय़ाशा तलावासारखं पाणी असतं, ते पाणी ‘ओल्ड मंक’ या ‘रम’सारखं दिसतं. ते वाहत डोंगराच्या कडय़ापाशी येऊन कोसळलं की, पडताना त्याचं रूप पांढऱया ‘बकार्डी’सारखं होतं आणि पुन्हा खाली नदीत मिसळलं की, बकार्डीत कोकाकोला मिसळल्यासारखं वाटतं. निसर्गाचा तो अद्भुत बार आहे. हा काही जगप्रसिद्ध धबधबा नाही, पण हा छोटा धबधबा विविध कोनांतून पाहताना मजा येते. हे विविध कोन विविध गॅलरीजच्या रूपाने

ऑस्ट्रेलियन टुरिझम डिपार्टमेंटने उभे केले. याला कल्पकता म्हणतात! एक जागा तर अशी आहे, पाणी फक्त वरून पडून नदीच्या कुशीत शिरतानाच दिसत नाही तर नदीच्या खांद्यावर बसून थेट निळ्या सागरात दूरवर मिसळताना दिसतं, बकार्डी वुईथ कोकचं निळय़ा सागरातलं कॉकटेलही दूरवर तुम्ही पाहू शकता. जंगल पाहताना झाडाचं ताठपण नजरेत भरतं. काही पक्षी, काही विचित्र सरडे, बेडकं दिसतात, पण फार प्राणी काही दिसले नाहीत. प्रचंड हिरव्या पॅराशूटला आपल्याला अदृश्य दोराने बांधलंय आणि आपण जमिनीवर चालतोय असं वाटतं.

स्कायरेलचं शेवटचं स्टेशन कुरांडा. तिथूनच ट्रेन सुटते आणि ती तुम्हाला समुद्रसपाटीवर फेअर वॉटर स्टेशनवर परत घेऊन जाते. येताना स्कायरेलने येणारा माणूस जाताना या कुरांडा सीनिक ट्रेनने जातो. थोडक्यात कुरांडा हे माथेरान आहे आणि फेअर वॉटर हे नेरळ किंवा खंडाळा आणि कर्जत! कुरांडा हे अर्थात पेंटिंगमधलं गाव आहे. हे पेंटिंग आपल्यासारखी माणसंच करतात, पण मग आपली पेंटिंग्ज स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारखी सुंदर का नाही असत? परमेश्वराने आपल्याला चांगला निसर्ग दिलेला नाही का? केरळपासून हिमाचलपर्यंत देवाने उत्कृष्ट निसर्ग आपल्याला दिला. कश्मीरपेक्षा आणखी सुंदर जगात काय आहे? पण आपल्याला आर्ट गॅलरीत ठेवण्यासारखं पेंटिंग करणं फार क्वचित जमलं. कुरांडात छोटी रेस्टॉरंट एक मस्त बाजार. जिथे आकर्षक वस्तू महाग करून ठेवलेल्या असतात. फुलपाखरांचा म्युझियम जिथून मला माझ्या नातीला बाहेर काढणं कठीण गेलं. ती फुलपाखरू बनून त्यांच्याशी खेळत बसली वगैरे गोष्टी आहेत. श्रीमंतांची सेकंड हाऊसेस आहेत. माथेरान कुरांडापेक्षा जास्त सुंदर होऊ शकतं. खंडाळा कुरांडाच्या स्तरावर स्वच्छ ठेवले तर कुरांडा खंडाळ्याची धाकटी पाती वाटेल. पण कधी कधी वाटतं की, ते आपल्या रक्तातच नाही. कुरांडातून परतीचा प्रवास हा खंडाळ्याहून कर्जत किंवा माथेरानहून नेरळसारखा होता. निसर्ग तितकाच लोभसवाणा. पावसाळ्यात खंडाळ्यालाही धबधबे दिसतातच, पण गाडी काय होती! शंभर वर्षे जुना डबा होता, पण असा सजवला होता की, म्हातारी षोडशवर्षा वाटत होती. गाडीत कॉमेंट्री होती. श्रीलंकेत कॅण्डी ते कोलंबो हा प्रवास मी एकदा ट्रेनमधून केला होता. त्याला ‘ऑब्झर्वेशन क्लास’ नावाचं तिकीट मिळायचं. संपूर्ण डबा वरून आणि बाजूला पारदर्शक होता. त्यातून बाहेरचा श्वास रोखून धरावा असा निसर्ग दिसायचा. कुरांडाला ती आठवण झाली. हे आपण आपल्या खंडाळ्याला, माथेरानला, इतरत्र जिथे गाडी डोंगरात जाते तिथे करू शकत नाही का? देवाने दिलेल्या निसर्गात रंग भरा. सुंदर पॅकेज करा आणि मार्केटिंग करा. कुरांडा आपल्याकडेही तयार होईल, पण ती इच्छाशक्ती कुठाय!

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या