रत्नागिरीत मुस्लीम विद्यार्थ्यांने साकारली सुबक गणेशमृर्ती

कलेला आणि कलाकारला जातीधर्माच्या भिंती नसतात याचा प्रत्यय रत्नागिरीत घेण्यात आलेल्या गणेशमुर्ती स्पर्धेत आला. ‘माय फ्रेंड गणेशा’ या गणेशमुर्ती बनविण्याच्या स्पर्धेत माने इंटर नॅशनल स्कूलच्या रशीद मालगुंडकर या मुस्लीम विद्यार्थांने सहभागी होत सुबक गणेशमुर्ती साकारली. रशीदला गणेशमूर्ती साकारताना पाहून अनेकांनी त्याच्या कलेचे कौतुक केले. त्यानेही सुंदर गणेशमुर्ती साकारताना पुढील वर्षीच्या स्पर्धेत त्याने यापेक्षा जास्त मेहनत घेऊन अधिक आकर्षक गणेशमुर्ती साकारू असे सांगितले. यावेळी रशीदची आई उपस्थित होती.

आर्ट सर्कल रत्नागिरी आणि आसमंत बेनवोलेन्स यांच्यावतीने रविवारी ‘माय फ्रेंड गणेशा’ ही शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत जीत कोसुंबकर,प्रतिक पाडावे आणि सूरज रामाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पटर्वधन हायस्कूल येथे आयोजित माय फ्रेंड गणेशा स्पर्धेत 92 स्पर्धक सहभागी झाले होते. पाचवी ते सातवी पहिला गट, आठवी ते दहावी दुसरा गट आणि मागील वर्षीच्या विजेत्यांचा तिसरा गट अशी तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

पहिल्या गटात पटवर्धन हायस्कूलच्या जीत कोसुंबकरने प्रथम क्रमांक पटकावला. तर त्याच हायस्कूलच्या शर्वरी भुतेने द्वितीय क्रमांक मिळवला. दामले विद्यालयाच्या स्वयंम जाधवला तिसरा क्रमांक देण्यात आला. दुसऱ्या गटात शिर्के हायस्कूलच्या प्रतिक पाडावेने प्रथम, महालक्ष्मी विद्यालयाच्या आयुष मोहितेने द्वितीय, तर शिर्के हायस्कूलच्या मृग्णेश पावसकरने तृतीय क्रमांक मिळवला. तिसऱ्य़ा गटात शिर्के हायस्कूलच्या सूरज रामाणेने प्रथम, पटवर्धन हायस्कूलच्या संचित विचारेने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी परिक्षक संतोष साळवी,आर्ट सर्कलचे मनोज देसाई आणि सुनील वणजू उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या