माझा सावळा पांडुरंग

नामदेव सदावर्ते

पंढरीची वारी आणि पालखी सोहळा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकप्रवाह आहे. वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्त्वाची यात्रा. विठ्ठल या तीन अक्षरांची जादू काय आहे याचा शोध प्रत्येक वर्षी आनंदवारीत घेतला जातो. या पालखी सोहळ्याच्या नियोजनात आणि वारी परंपरेत महत्त्वाची भूमिका बजावणारे राजाभाऊ चोपदार हे माऊलींचे परंपरागत चोपदार. या लेखाच्या माध्यमातून राजाभाऊंनी या आनंदवारीचा समतेचा, विश्वबंधुत्वाचा आणि डोळस भक्तीचा विचार मांडला आहे.

चारही वेद ज्या परमात्म्याचे वर्णन करून थकले, अठरा पुराणेही न थांबता श्रीहरिवर्णनाच्या मागे धावता धावता स्थिरावली, सहा शास्त्रही श्रीहरीचे वर्णन करीत लाजून शांत बसले अशा श्रीहरिपरमात्म्याचे सगुण रूप पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपाने विराजमान झाले.
‘तें हें समचरण उभे विटेवरी । पहा भीमातीरीं विठ्ठल रूप ।।’
निर्गुण रूपाचे वैभव केवळ भक्तिभावाच्या बळाने भक्त भाविकांसाठी श्रीविठ्ठलरूपाने पंढरपूरला वास्तव्यास आले. ज्ञानी जनांची जाणीव, योगीजनांची ध्येयवस्तू, गुरुमंत्राचे गुह्य असे श्रीविठ्ठल स्वरूप मराठी भाषिक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ज्ञानदेव-नामदेवांनी या अनादी श्रीविठ्ठलाला आपले जीवन समर्पित केले. आषाढी-कार्तिकी एकादशीच्या दिवशी लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपूर येथे जमतो. आठशे वर्षांपासून ही लोकविलक्षण अलौकिक परंपरा अबाधित व वर्धिष्णू आहे. कटेवर कर ठेवून विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या श्रीविठ्ठलाचे आकर्षण संतांना आहे. तितकेच प्रेम आणि आकर्षण भाविकांनाही असते. कारण संतांनी आपल्या अभंगवाणीतून त्या सुंदर ते ध्यान असलेल्या श्रीहरी श्री विठ्ठलरूपाचे अवीट वर्णन करून ठेवले आहे.

राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ।।

सुंदरपणात जो मदनाचा बाप आहे, त्रैलोक्यात जो उदार आहे, दैत्यांचा नाश करणारा शूरवीर आहे, चतुरपणात जो ब्रह्मदेवाचा बाप आहे, सर्व तीर्थांपेक्षा जो पवित्र आहे आणि सकळ जीवांचा जो आधार आहे, असा श्रीविठ्ठल आमचा देव आहे. तो आमच्या हृदयात नित्य वास करीत असून आम्ही सदैव त्याचेच नामस्मरण करीत असतो. त्यामुळे मायानदी, कामक्रोधादी वैरी यांचे आम्हाला भय वाटत नाही. श्री विठ्ठलाच्या दर्शनाने होणाऱ्या सुखाच्या परमावधीचे वर्णन संत नामदेव करतात-
सुखाचे हे सुख श्रीहरि मुख ।
पाहताचि भूक तहान गेली ।।१।।
भेटली भेटली विठाई माऊली ।
वासना निवाली जीवांतील ।।२।।
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ।।३।।
नामा म्हणे पाप ताप आणि दुःख ।
गेले झाले सुख बोलवेना ।।४।।

असा हा पंढरीचा श्री विठ्ठल सर्व जीवांचा विसावा, आधार आहे. अठ्ठावीस युगांपासून पंढरीत विटेवर उभा असलेला हा श्री विठ्ठल प्रत्येक जीवाच्या रोमारोमात वसलेला आहे हे विसरू नका. अशा पांडुरंगाला आपल्या हृदयात पहा. संत नामदेव सांगतात-
तो हा माझा विठोबा सर्वांघटी सम ।
न सांडावे वर्म नामा म्हणे ।।
श्री विठ्ठल आराध्य दैवत असून, भक्तांची वाट पाहत तो पंढरपूर येथे विटेवर उभा आहे. अशा श्री विठ्ठलाची आवड निर्माण होण्यासाठी अनेक जन्म सुकृत्ये करावी. संत ज्ञानराज म्हणतात –
बहुत सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठली आवडी ।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवी वर ।।

आम्ही यापूर्वीच्या अनेक जन्मांमध्ये खूप पुण्यकर्मे केली म्हणून या विठ्ठलाने आमच्यावर या मानवजन्मात कृपा केली. या दुःखरूपी संसारात जन्मी येताच श्री पांडुरंगावर विश्वास ठेवून आम्ही त्याचे भक्त झालो. भ्रमर फुलावर व माशी जशी मधावर एकरूप होते तसे माझे मन श्री विठ्ठलचरणी लीन झाले. इतर मायिक, दुःखद पदार्थ, भोगवृत्तीवर जर मन लुब्ध झाले तर संसारात दुःख-शोकच निर्माण होईल. म्हणून तेथे मनाला न गुंतविता श्रीहरिचरणी मनवृत्ती राहो.

एकदा श्रीविठ्ठलप्रेमाने देह भारला की कामक्रोधादि वैरी ते देहरूपी घर रिकामे करतात. देह हाच पंढरपूर असून, प्रेमरूप पुंडलिकाने तेथे वास्तव्य केले आहे. त्यातून सुस्वभाव प्रगट होत वाहत असतो तीच चंद्रभागा आहे. विवेकाच्या विटेवर आत्मारूपी पांडुरंग उभा आहे. जीवनात क्षमा आणि दया या दोन्ही रुक्मिणी व राही असून, त्या सदैव आत्मा पांडुरंगाच्या दोन्ही बाजूस आहेत. बुद्धी आणि वैराग्य हे आपल्या जीवनरूपी पंढरपुरातील गरूड व हनुमंत आहेत.

पंढरीच्या पांडुरंगाची संतांना खूप ओढ असते. श्री विठ्ठलाने येऊन आपल्याला भेटावे असे ते देवाला सतत विनवत असतात –
येतियां पूसें जातियां धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।।१।।
येई वो विठाई आई माऊली ये ।
निढळावरी कर ठेवूनि पालविये ।।२।।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरीं बैसोनि माझा कैवारी आला ।।३।।
डोळ्यांतील बाहुली माझी विठाई झाली ।
घनानंद मूर्ति माझ्या ध्यानासी आली ।।४।।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिवाळी ।
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी ।।५।।
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील प्रमुख भक्तिसंप्रदाय आहे. पंढरीचा पांडुरंग या पंथाची अधिष्ठात्री देवता असून, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे संतचतुष्ठय या संप्रदायाचे प्रमुख व भक्त पुंडलिक हा आद्य संत आहे. माता-पिता ही परमात्म प्रेमाची सगुण रूपे आहेत. यादृष्टीने भक्त पुंडलिक हा त्या परमात्म प्रेमाचीच उपासना करीत होता. त्यामुळे संतुष्ट होऊन श्री पांडुरंगराय श्री विठ्ठलरूपाने सगुण साकार प्रकट झाले. श्री विठ्ठल हे सर्व संतांच्या भक्तीचे उगमस्थान होते.

आपल्या जीवनाचे सर्वस्व त्या श्री विठ्ठलाच्या चरणी वाहून त्याच्याशी प्रेमभावाचे नाते जोडून भक्ती, प्रेम, काव्यनिष्ठा श्री पांडुरंगाला समर्पित केली. संतांनी श्री विठ्ठल प्रेम-भक्तीपुढे मोक्ष, वैकुंठ, स्वर्ग, कैलास तुच्छ मानला आहे. एकविध व एकनिष्ठ विठ्ठलभक्ती हे संतांचे वैशिष्टय़ आहे. संत नामदेव महाराज म्हणतात –
आम्ही स्वर्गसुख मानूं जैसा ओक ।
देखोनियां सुख पंढरीचे ।।१।।
न लगे वैकुंठ न वांछू कैलास ।
सर्वस्वाची आस देवा पायी ।।२।।
न लगे संतति आणि धन मान ।
एक असे ध्यान विठोबाचे ।।३।।
सत्य की मायिक आमुचें बोलणे ।
तुझी तुज आण सांग हरि ।।४।।
जीवभाव आम्ही सांडू ओंवाळुनि ।
नामा लोटांगणी महाद्वारी ।।५।।