‘आई मला गर्भातच मारणार होती’, विनोदी अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट

59

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारती सिंग हे नाव ऐकलं की प्रत्येकाला हसवणाऱ्या विनोदी अभिनेत्रीचा चेहरा समोर येतो आणि त्यासोबतच एक गोड हसूही. भारतीने आपल्या कलेच्या जीवावर मनोरंजन आणि कॉमेडी क्षेत्रामध्ये मोठे यश मिळवले आहे. परंतु सर्वांना हसवणाऱ्या या अभिनेत्री आपल्या आयुष्यात घडलेली एक अशी घटना सांगितली आणि सर्वांचेच डोळे पाणावले. मी पोटात असताना माझी आई मला गर्भातच ठार करणार होती, असे भारतीने सांगितले. अभिनेता राजीव खंडेलवालच्या ‘जझबात’ या चॅट शोमध्ये बोलताना भारतीने ही घटना सांगितली.

‘मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करण्याआधी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आईने गर्भपाताचा निर्णय घेतला होता. परंतु नंतर तिने तो बदलला आणि मला जन्म दिला’, असं भारतीने सांगताच प्रेक्षकांचे डोळे पाणावले. ‘त्यावेळी आईने गर्भपाताचा निर्णय कसा घेतला असेल? याची मला कल्पनाही करवत नाही. आज मात्र तिला माझा प्रचंड अभिमान आहे’, असे भारती कौतुकाने म्हणाली.

आणखी एक आठवण सांगताना भारती म्हणाली की, ‘माझ्या एका परफॉर्मन्सच्या आधी आईची तब्येत खालावली आणि तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. आईची ही स्थिती पाहून माझ्यात शो करण्याचा फारसा उत्साह नव्हता. पण आईनेच मला प्रोत्साहन देऊन कार्यक्रम करण्यास सांगितलं’, असेही भारतीने सांगितले.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा कॉमेडी शो, ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिये’ यासारखे डान्स रिअॅलिटी शो आणि ‘बिग बॉस’, ‘फिअर फॅक्टर’मध्येही भारती झळकली.

आपली प्रतिक्रिया द्या