माझा जोडीदार

907

आपला जोडीदार कसा असावा… स्वप्नीचा राजकुमार… स्वप्नसुंदरी… इ. इ. आपल्यापैकी सगळ्यांनीच याविषयी कल्पना… स्वप्नं रंगवलेली असतात. आजच्या तरुणाईच्या सगळ्या कल्पना, स्वप्नं, दिशा, धोरणं अगदी सुस्पष्ट आणि नेमकं असतं. मग पाहूया आजच्या तरुणाई जोडीदार कसा हवा…

नात्याला स्पेस देणारा हवा

actor-1
मी अशा क्षेत्रात आहे जिथे कामाच्या ठरावीक वेळा नाहीत. कधीतरी कामाचा ताण वाढतो. हा ताण दूर करण्यासाठी बोलायला, मनातलं शेअर करता यावं असं कोणीतरी असावं…. ते शेअरिंग खूप छान असावं. आमच्या वेव्हलाईन जुळायला हव्यात. आवडीनिवडी वेगळ्या असतील चालेल… त्यात आणखी मजा येईल. कारण तेव्हाच ते नातं इंटरेस्टिंग होऊ शकतं. जोडीदाराकडून सतत काहीतरी शिकायला मिळावं. त्याच्याशी बोलल्यावर मन शांत व्हायला हवं. कलेची आवड असलेली व्यक्ती मला नक्की आवडेल. पण तो नात्याला स्पेस देणारा असावा. त्या नात्याचा त्रास होता कामा नये. उलट गोडवा वाटायला हवा. मला गोष्टी वाचायला, सिनेमे पाहायला आवडतात… त्याच्यातही ही आवड असली तर बेस्ट…
– शिवानी रांगोळे

लव्ह ऍट फर्स्ट मीटिंग असले पाहिजे

actor
जोडीदार म्हणजे ज्याच्यासोबत लग्न करता येईल… माझ्या जनरेशनच्या प्रत्येकाचे असेच मत आहे. पण आता सेटल होण्याची व्याख्या जशी बदलतेय, तशीच जोडीदाराचीही बदलतेय… अलीकडे वाढलेल्या स्पर्धा पाहता कोणीतरी जी आयुष्याच्या ध्येयासाठी मदत करेल आणि तुम्हालाही तिच्या ध्येय गाठण्याच्या कामात मदत करावीशी वाटेल असं कुणीतरी भेटणं गरजेचं आहे. आमच्या आवडीनिवडी सारख्याच असल्या तर बेस्ट… मला वाचनाची प्रचंड आवड आहे. मला सिनेमे आणि नाटक पाहायला आवडतात. इतरांना दाखवायलाही आवडतात. मला आवडलेली पुस्तके मित्रांना वाचायला द्यायला आवडतात. त्यामुळे जोडीदार ‘गिव्ह ऍण्ड टेक’ असला तर फारच मजा येईल. जोडीदार दिसायला कसाही असला तरी आमची मनं जुळायला हवीत. लव्ह ऍट फर्स्ट साईट म्हटलं जातं, पण माझ्यासाठी लव्ह ऍट फर्स्ट मीटिंग असले पाहिजे. कारण तुम्ही भेटल्यावर जर मनं जुळली तर मग त्याचा दिसण्याशी फार संबंध नसतो. नशिबाने माझ्या घरचे असे आहेत की मला त्याचा फारसा विचार करावा लागणार नाही.
– विराजस कुलकर्णी

मनाचं नातं सगळ्यात महत्त्वाचं

abhinay-berde
माझ्या मनातला जोडीदार असं काही ठरवलं नाहीय अजून… पण माझा जोडीदार कणखर आणि महत्त्वाकांक्षी असावा असं वाटतं. तिने आयुष्यात काहीतरी दिशा ठरवलेली असावी. जोडीदार असा असावा ज्याच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळतील. नात्यात आधी चांगली मैत्रीण असावी. ज्याच्यासोबत सगळं काही शेअर करता आले पाहिजे. जिच्यासोबत बोलताना कुठलाही संकोच नसावा, तिच्यासमोर मन मोकळं करता आलं पाहिजे आणि मनाचा ताण कमी व्हायला हवा. माझ्या तशा जास्त अपेक्षा नाहीत, कारण मी खूप प्रॅक्टिकल आहे. माझ्यासाठी जोडीदाराचं दिसणं फारसं महत्त्वाचं नाही कारण दिसणं तात्पुरतं असतं, पण स्वभाव कायमस्वरुपी असतो. अशा स्वभाव जुळलेल्या दोघांचे कॉम्बिनेशन असेल तर ती व्यक्ती जोडीदार म्हणून मला नक्की आवडेल. कारण मनाचं नातं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. आपण तिच्या कुटुंबासोबत नातं निर्माण करत असतो. त्यामुळे तिच्या घरचे स्वतंत्र विचारांचे, मॉर्डन असावेत असंही वाटतं.
– अभिनय बेर्डे

आपली प्रतिक्रिया द्या