मोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना

419

सामना ऑनलाईन, स्कारब्रो

अमेरिकेमधील एका फोटोने भल्याभल्यांना वेड लागायची पाळी आली आहे. फोटो अगदी साधा आहे, एक मुलगी छान निळा ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर पोझ देतेय आणि एक छोटी मुलगी तिच्यामागे खिडकीजवळ खेळण्यांच्या बास्केटमागून डोकं वर काढून फोटो काढताना बघतेय. हा फोटो सामान्य वाटत असला तरी त्यामागचं तथ्य ऐकल्यानंतर तुम्हीही उडाल, कदाचित तुम्हाला रात्री झोपही लागणार नाही.

लॉरा सिसी या ३८ वर्षांच्या महिलेने तिच्या मोठ्या मुलीचा म्हणजेच आयेशाचा जवळपास १० वर्षांपूर्वी फोटो काढला होता. काही दिवसांपूर्वी लॉरा यांना अल्बम चाळत असताना हा फोटो दिसला, हा फोटो बघताच त्या उडाल्याच, कारण या फोटोमध्ये आयेशाच्या मागच्या बाजूस त्यांची लहान मुलगी सोफीचा फोटो दिसला. फोटो केव्हा काढला याचा त्यांच्याकडे तपशील असल्याने त्यांनी तो बघितला आणि त्यांना घाम फुटला, कारण हा फोटो जेव्हा काढला तेव्हा सोफीचा जन्मच झाला नव्हता. सोफीचा जन्म हा फोटो काढल्यानंतर तीन वर्षांनी झाला होता.

लॉरा यांनी फोटो काढला तो क्षण आठवत सांगितलं की फोटो काढला तेव्हा आयेशा व्यतिरिक्त घरी कोणीच नव्हतं, बाहेर पाऊस पडत होता आणि घरी दिवसभर कोणी आलंही नव्हतं. काहींनी लॉरा यांना वेड्यात काढत ती बाहुली असेल असं म्हटलं मात्र लॉरा यांनी सांगितलं की आयेशाकडे कोणतीही बाहुली नव्हती. ज्या घरात हा फोटो काढला होता, ते घर बऱ्याच वर्षांपूर्वी लॉरा आणि तिच्या कुटुंबाने सोडलं आहे. हा फोटोशॉप केलेला फोटो असेल असं काहींचं म्हणणं आहे, मात्र लॉराचं म्हणणं आहे की आम्ही असं काहीही केलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या