आजचा सर्वाधिक चर्चेतला फोटो, रतन टाटांना दिग्गज उद्योगपतीचा वाकून नमस्कार

1795
ratan-tata-narayanmurthy

हिंदुस्थानची मूल्य आणि संस्कार आजही जिवंत आहेत आणि विशेष म्हणजे देशातल्या दिग्गज उद्योगपतीनं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. बुधवारी सोशल मीडियावर उद्योग जगतातील महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हणजे टाटा समूहाचे रतन टाटा आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका फोटोची सर्वाधिक चर्चा सुरू होती.

देशातील ‘आयटी’ जगतात टीसीएस आणि इन्फोसिस या कंपन्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. दोन्ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत. मात्र या दोन्ही कंपन्यांतील महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हणजे टाटा समूहाचे रतन टाटा आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे समोर आल्यानंतर नारायण मूर्ती यांनी रतन टाटा यांना हिंदुस्थानी सभ्यतेप्रमाणे वाकून, पायाला स्पर्श करत नमस्कार केला. तो क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला असून फोटो चांगलाच चर्चेत आला. हिंदुस्थानी सभ्यतेचं दर्शन या फोटोतून होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

गेल्या मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रतन टाटा यांना हा पुरस्कार इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर त्यांनी केलेल्या कृतीमूळे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. इन्फोसिसचे सहसंस्थापक 73 वर्षीय नारायण मूर्ती यांनी 82 वर्षीय रतन टाटा यांच्या पायाला स्पर्ष करून आर्शीवाद घेतले.

या कार्यक्रमात रतन टाटा यांनी स्टार्टअप कंपन्यांना इशारा दिला त्यात ते म्हणाले की, ‘गुंतवणूकदारांचे पैसे वाया घालवणाऱ्यांना दुसरी किंवा तिसरी संधी नाही देण्यात येणार’.

ते म्हणाले की, ‘आमच्या समोर अशा स्टार्टअप कपंन्या पण असू शकतात ज्या आपल्या लक्ष वेधून घेतील, पैसे कमावतील आणि गायब होतील. अशा कंपन्यांना दुसरी किंवा तिसरी संधी देण्यात येणार नाही’.

स्टार्टअप कंपन्यावर गुतवणुकदारांचे पैसे वाया घालवत आहेत, असा आरोप होत असतानाच रतन टाटांनी हे वक्तव्य केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या