नाबार्ड जिल्हा बँकावर वॉचडॉग म्हणून काम करतेय! मुख्य व्यवस्थापक शिरसाळकरांचे उद्गार

560

आज खासगी बँका तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक सोयीसुविधा देत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेलाही एटीएम सुविधा, मोबाईल बँकिंग हवे आहे. अशावेळी जिल्हा बँकांनीही तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत त्याकरीता नाबार्ड जिल्हा बँकाना सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचे सांगताना नाबार्ड जिल्हा बँकावर वॉचडॉग म्हणून काम करत असून बँकाच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देताना चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी नाबार्ड काम करते असे नाबार्ड पुणेचे मुख्य व्यवस्थापक यु. डी. शिरसाळकर यांनी स्पष्ट सांगितले. ते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 62 व्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते.

स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित वर्धापनदिन सोहळ्यात नाबार्ड पुणेचे मुख्य व्यवस्थापक यु.डी.शिरसाळकर पुढे म्हणाले की, 1980 साली जिल्हा बँकेत फारसे तंत्रज्ञान वापरले जात नव्हते. नंतरच्या काळात बँकेत एखादा संगणक असायचा परंतू अलीकडे बँकीग क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली.आयसीआयसीआय, एचडीएफसी बँका येतानाच एटीएम आणि सीबीएस तंत्रज्ञान घेऊन आल्या होत्या. त्यामुळे इतर बँकांकडून ग्राहक अशा सुविधांची मागणी करू लागले होते. जिल्हा बँकानीही एटीएम, कोअर बॅकींग सुविधा सुरु केल्या आहेत. भविष्यातही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांना आपण सुविधा देणे गरजेचे आहे. मोबाईल बॅकिंग मधून खेड्यापाड्यात मोबाईल व्हॅन नेऊन बॅकिंग सुविधा दिल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कितीही खासगी बँका आल्या तरी शेतकऱ्याचा जिल्हा बँकांवर विश्वास आहे,तो विश्वास आपण टिकवला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी आपल्या मनोगतात जिल्हा बँकेचा प्रगतीचा अहवाल मांडला.बँकेने सुरु केलेल्या सोयीसुविधांची माहिती देताना ते म्हणाले की, जिल्ह्यात 22 ठिकाणी एटीएम सेवा सुरु केली आहे. बँकेकडे 2003 कोटी रुपयांच्या ठेवी असून मार्च 2019 अखेर बँकेला 20 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जिल्हा बँक हि शेतकऱ्याची बँक आहे परंतू आजकाल शेती करायला तरूण वर्ग पुढे येत नाही. 50-55 वयोगटातील लोक शेती करत आहेत. तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना चोरगे म्हणाले की, सातारा बँकेची शेती कर्ज हि 1800 कोटी रुपयांची आहेत. रत्नागिरी जिल्हा बँकेची शेती कर्ज 25 कोटी रुपयांची आहेत त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, तरूणांनी शेतीकडे वळले पाहिजे बँक त्यांना सहकार्य करायला तयार असल्याचा विश्वास चोरगे यांनी व्यक्त केला.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव,नाबार्डच्या रत्नागिरी जिल्हा विकास प्रबंधक श्रध्दा हाजिरनीस,जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

नेतृत्वावरून बँकेची परीक्षा
शीतावरून भाताची परीक्षा अशी म्हण आहे तसेच सहकारी बँकेत नेतृत्वावरून बँकेची परीक्षा होते. रत्नागिरी बँकेला कुशल नेतृत्व मिळाले आहे. संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाशिवाय कर्मचारी काही करू शकत नाही. रत्नागिरी जिल्हा बँकेने गेल्या 12 वर्षात वेगाने प्रगती केली आहे.त्यांना मिळालेले पुरस्कार बँकेच्या कामाची पोचपावती देतात असे नाबार्ड पुणेचे मुख्य व्यवस्थापक यु.डी.शिरसाळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या