‘नाबार्ड’ने चौकशी अहवाल तयारच केलेला नाही; मुंबै बँक अध्यक्षांचा दावा

84

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्जवाटपात कोणत्याही स्वरूपाचा घोटाळा झालेला नाही. नाबार्डचे पथक आले नव्हते, नाबार्डच्या पथकाने कोणताही चौकशी अहवाल तयार केलेला नाही, असे स्पष्ट करत मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी घोटाळ्य़ाचे आरोप फेटाळून लावले.

प्रवीण दरेकर यांनी आज बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. बँक सध्या चांगले काम करत असून भविष्यातही बँकेची कामगिरी अधिकाधिक उंचावेल, असा आशावाद व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते. खाजगी आणि राष्ट्रीय बँका सहकारी बँकांच्या मुळावर उठल्या आहेत. त्यामुळे सहकारी बँकांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

– मुंबई बँकेच्या कामकाजावर नाबार्ड आणि आरबीआयचे थेट नियंत्रण असते. कर्जवाटप करताना मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्य़ाला जागा नसते, असा दावा दरेकर यांनी केला.
– 60 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या आहेत.
– बुडित कर्जाच्या वसुलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक आणि तीन गाड्य़ा ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बुडित कर्जे कमी झाली आहेत.
– कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर गिरणी कामगार, माथाडी कामगार, शिक्षणसंस्था, रुग्णालये यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते. त्याचबरोबर बीडीडी चाळीकडून प्रस्ताव आला तर त्याच्यासाठी बँक अर्थसाहाय्य करेल, असे दरेकर म्हणाले.

शिक्षकांच्या पगाराबाबत कोणताही वाद नाही
शिक्षकांचे पगार बँकेतून दिले जातात. २६ हजारांपैकी २१ हजार शिक्षकांचे पगार बँकेतून नियमित जातात. उर्वरित शिक्षकांचा युनियनबरोबर वाद असल्यामुळे त्या शिक्षकांना बँकेतून पगार नको आहे. मात्र, तो वादही आता लवकरच निवळणार असून शिक्षकांचा १०० टक्के पगार आमच्या बँकेतूनच होणार आहे. त्याचबरोबर येत्या काही काळात पोलीस आणि अंगणवाडी सेविकांचे पगारही बँकेतून दिले जावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या