‘कश्मीर फाईल्स’ सिनेमा तद्दन प्रचारकी आणि बीभत्स, ‘इफ्फी’त इस्रायली ज्युरी अध्यक्षाने ‘तोंड फोडले’

गोव्यात पार पडलेल्या 53व्या ‘इफ्फी’ महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात इस्रायली ज्युरी अध्यक्ष नदाव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर लाल शेरा मारला आहे. हा चित्रपट तद्दन प्रचारकी आणि बीभत्स असल्याचे परखड मत मांडत इस्रायली अध्यक्षांनी ‘तोंड फोडले’. विशेष म्हणजे, लॅपिड हे वक्तव्य करत असताना मंचावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचीदेखील उपस्थिती होती.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शनापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत होता. ‘इफ्फी’च्या निमित्ताने ‘कश्मीर फाईल्स’ पुन्हा एकदा उघडली आहे. नदाव लॅपिड यांच्या या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटले असून त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी लॅपिड यांच्या वक्तव्याचे खंडन करत हिंदुस्थानची माफी मागितली आहे.

‘तुम्हाला लाज कशी वाटत नाही’ अशा शब्दांत त्यांनी लॅपिड यांना फटकारले. अभिनेते अनुपम खेर आणि निर्माते अशोक पंडित यांनी देखील लॅपिड यांच्या वक्तव्याचा निषेध केला. ‘ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो’, असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे. तर, तीन लाख कश्मिरी पंडितांनी सहन केलेला अन्याय दाखवणे हे अश्लील म्हणता येणार नाही,’ असे निर्माते अशोक पंडित म्हणाले. दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लॅपिड यांच्या विधानाचे समर्थन करत ‘जगासमोर सत्य आले!’ असे ट्विट केले आहे.

निवड समितीही निशाण्यावर
या प्रकरणामुळे इफ्फीत ज्युरी अध्यक्ष म्हणून लॅपिड यांच्या नावाची शिफारस करणारी निवड समिती देखील निशाण्यावर आली आहे. या समितीमध्ये करण जोहर, प्रसून जोशी, मनोज मुंतशिर, खुशबू सुंदर, प्रियदर्शन, बॉबी बेदी, हृषिता भट्ट, निखिल महाजन, रवि कोट्टाराकारा, सुखविंदर सिंह आणि वाणी त्रिपाठी यांचा समावेश होता.

काय म्हणाले नदाव लॅपिड
‘कश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त झालो आहोत. हा चित्रपट आम्हाला प्रचारकी आणि बीभत्स वाटला. ‘इफ्फी’सारख्या प्रतिष्ठत चित्रपट महोत्सवात ‘कश्मीर फाईल्स’सारखा चित्रपट आलाच कसा? मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणे कलेसाठी गरजेची आहे, असे विधान नदाव यांनी केले होते.