भाजप नेत्याच्या सुपर बाईकवर सरन्यायाधीश बोबडे; ना मास्क, ना हेल्मेट!

देशाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे हे सुपरबाईक हार्डी डेविडसनवर बसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांनी मास्क लावलेला नाही तसेच हेल्मेटही घातलेले नाही. या फोटोवरून सोशल मिडियावर जोरदार टीका-टिपण्णी सुरू आहे. दरम्यान, ही बाईक नागपुरातील एका भाजप नेत्याची आहे.

नेहमी काळा कोट परिधान करून सर्वोच्च न्यायालयात दिसणारे सरन्यायाधीश बोबडे हे काळी ट्रक पॅण्ट, टी-शर्ट आणि स्पोर्टस शुजमध्ये दिसत आहेत. सध्या ते मूळ गावी नागपूर येथे आहेत. हार्डी डेविडसनवर सरन्यायाधीश बोबडे यांचा फोटो व्हायरल झाला आणि चर्चेला उधान आले. सरन्यायाधीश बोबडे हे विनामास्क, विना हेल्मेट बाईकवर आहेत. मात्र त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मास्क लावल्याचे दिसत आहे. कोरोना महामारी काळात सर्वांनी मास्त लावण्याची सक्ती आहे. ट्विटर, फेसबुक, व्हॉटस्अॅपवर या मुद्दय़ावर युजर्सनी लक्ष वेधले आहे. तसेच ही सुपरबाईक नागपुरातील भाजप नेत्याच्या मुलाच्या नावावर रजिस्टर असल्याचेही वृत्त आहे.

प्रशांत भूषण यांनी लक्ष वेधले

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी ट्विटद्वारे घटनेकडे लक्ष वेधले आहे. सरन्यायाधीश 50 लाखांच्या बाईकवर नागपुरात राजभवन येथे राईड करीत आहेत. त्यांनी मास्क लावलेले नाही आणि हेल्मेटही नाही. ही बाईक भाजप नेत्याची आहे. ही ती वेळ आहे, जेव्हा सुप्रीम कोर्ट लॉकडाऊन मोडमध्ये ठेवले आहे आणि नागरिकांना न्याय मागण्याच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या