पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या; आरोपीला अटक

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी संजय पुरी याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरूद्ध कलम 302, 376, पाॅक्सो तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान आरोपीला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केले असता 13 नोव्हेंबरपर्यत पोलिस कोठडी देण्यात आली. सरकारतर्फे अॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली. पीडित मुलीच्या वडीलांनी माध्यमांशी बोलताना आरोपीला फाशीची शिक्षाच ठोठावण्यात यावी, अशी मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या घरापासून जवळच तिच्या आजीचे घर आहे. मुलगी नेहमीच आजीकडे जात असे. याच रस्त्यावरील एका शेतात आरोपी संजय पुरी सालगडी म्हणून काम करीत होता. त्याला पीडित मुलगी रोज आजीकडे जाणेयेणे करते हे माहिती होते. शुक्रवार नेहमीप्रमाणे आजीकडे गेलेली मुलगी शनिवारी ७ ला परत आली नाही. म्हणून कळमेश्वर पोलिस ठाण्यात कलम 363 अंतर्गत मुलगी हरवल्याची तक्रार देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. शनिवारी रात्री तपास थांबवण्यात आला. रविवार सकाळी तपास सुरू केला असता लिंगा येथील एका तुरीच्या शेतात मुलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला. आरोपीने मुलीला चाॅकलेचे आमिष दाखवून शेतात नेले व तिथे तिच्यावर बलात्कार करून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या