
पुण्यासह राज्यभर सध्या गाजत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता नवे अपडेट आले आहेत. नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरु केली आहे. लाच लुचपत विभागाकडून प्रकरणाची खुली चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
खेडकर कुटुंब हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आहेत. पुण्यासह अन्य ठिकाणी सुद्धा त्यांचे वास्तव्य होते. खेडकर प्रकरण प्रकाशझोतात आल्यानंतर नगर जिल्ह्यामध्येही एक पथक चौकशीसाठी आले होते. मात्र खेडकर कुटुंबासंदर्भात कोणताही तपशील मिळू शकला नव्हता. आता या प्रकरणासंदर्भात अनेक धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तपास सुरू करण्यात आलेला आहे.
वरिष्ठ पातळीवरून खेडकर कुटुंबाची विविध माहिती मागण्यात येत आहे. त्यामुळे अनेक बाबी पुढे येत आहेत. यामध्ये पूजा खेडकरने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आता सुरू झालेली आहे. दोन दिवसापूर्वीच नगरच्या जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चार विभागाच्या एकत्रित माहिती घेऊन विभागीय आयुक्त यांना सविस्तर अहवाल पाठवला आहे.
आता नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खेडकर प्रकरणासंदर्भात खुली चौकशी सुरू केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रकाश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. नगरमधील व जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये लेखी पत्र देऊन माहिती गोळा करण्यात येत आहे.