नगर शहर बँकेत 25 तोळे, तर नागेबाबा पतसंस्थेत 22 तोळे बोगस सोने आढळले

नगर शहरामध्ये बनावट सोन्याचा विषय काही संपायला तयार नाही. सहकारी बँकेमध्ये आज एका खात्यामध्ये तब्बल 25 तोळे तर दुसरीकडे नागेबाबा पतसंस्थेमध्ये दोन व्यक्तींच्या खात्यामध्ये 22 तोळे बोगस सोने आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी अन्य खात्याचा आम्ही तपास सुरू केला असून त्याची तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इतर पतसंस्थांची माहिती अद्याप येणे बाकी असल्याचेही ते म्हणाले.

शहर सहकारी बँकेमध्ये याअगोदर 8 किलो बोगस सोने आढळून आलेले आहे, तर दुसरीकडे पाच पतसंस्थांचा विषयसुद्धा अशाच पद्धतीने होता, कोतवाली पोलिसांनी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना पत्र देऊन याची माहिती मागवली होती, तर तपासामध्ये काही बाबी पुढे आल्यानंतर नागेबाबा पतसंस्थेची तपासणी सुरू करण्यात आली. तेथेसुद्धा आतापर्यंत पावणे आठ किलो बोगस सोने आढळून आलेले आहे

आज या दोन्ही प्रकरणासंदर्भातली तपासणी पोलिसांनी केली आहे. यामध्ये शहर सहकारी बँकेमध्ये एका व्यक्तीचे खाते तपासल्यानंतर 25 तोळे बोगस सोने आढळून आले असून त्याची रक्कम 8 लाख 40 हजार रुपये एवढी आहे, तर दुसरीकडे नागेबाबा पतसंस्थेमध्ये दोन व्यक्तींची चार खाती होती. याबाबत तपास केल्यानंतर एकूण 22 तोळे बोगस सोने त्याची रक्कम 7 लाख 38 हजार रुपये असल्याचे तपासामध्ये उघड झालेले आहे.

बनावट सोन्याचा विषय दिवसेंदिवस वाढत चालला असून दोन्ही ठिकाणी एकाच वेळी बोगस सोने आढळून आल्यामुळे साधारणत: 48 तोळे सोने बोगस आढळले आहे. मागील बोगस सोन्याचा विषय लक्षात घेता याची व्याप्तीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी दिली तसेच याव्यतिरिक्त अन्य पतसंस्थेच्या संदर्भातलीसुद्धा माहिती पोलीस घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.