
कंपनी मालकाच्या आवाजात व्यवस्थापकाला बनावट फोन करून दोन वेगवेगळ्या खात्यामध्ये 18 लाख 95 हजार 713 रुपये पाठविण्यास सांगितले. व्यवस्थापकानेही त्या फोनवरील व्यक्तीला प्रतिसाद देत संबंधित बँक खात्यावर पैसे पाठविले. दरम्यान, फोनवरील व्यक्ती आपले मालक नसल्याचे लक्षात येताच फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर व्यवस्थापकाने सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा हा नवीन प्रकार नगर शहरात समोर आला आहे.
स्वप्नील शरद कुलकर्णी (वय 41, रा. बालिकाश्रम रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका अनोळखी मोबाईल नंबरवरील व्यक्तीविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुराग धुत यांची नगर आणि सुपा एमआयडीसीत इलेक्ट्रिक वस्तू निर्माण करण्याची कंपनी आहे. त्याचे कामकाज नगरमधून चालते. या कंपनीत व्यवस्थापक म्हणून स्वप्नील कुलकर्णी काम पाहतात. ते कार्यालयात असताना त्यांना 18 जानेवारीला सकाळी 11 वाजता एक अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी तो फोन उचलताच, ‘मी अनुराग धुत बोलत आहे. हा माझा नवीन नंबर आहे,’ असे सांगून विश्वास संपादन केला. फोनवरील व्यक्तीने राजकुमारी देवी या नावाने आयसीआयसी बँकेत खाते असलेल्या खाते नंबर व आयएफसी नंबर सांगून त्यावर नऊ लाख 96 हजार 207 रुपये व दुखीराम या नावाने आयसीआयसी बँकेत खाते असलेल्या दुसऱया एक खाते नंबर व आयएफसी नंबर सांगून त्यावर आठ लाख 99 हजार 506 रुपये असे दोन खात्यावर 18 लाख 95 हजार 713 रुपये टाकण्यास सांगितले. कुलकर्णी यांनी मालकाने पैसे पाठविण्याचे सांगितले म्हणून तत्काळ पैसे पाठविले. दरम्यान, काही वेळाने सदरचा नंबर आपले मालक अनुराग धुत यांचा नसल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधून फसवणूक झाल्याचे सांगितले. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात लाख रुपये मिळाले परत
आपली फसवणूक झाली असल्याचे व्यवस्थापक स्वप्नील कुलकर्णी यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ येथील सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, स्मिता भागवत, प्रीतम गायकवाड यांनी लगेच आयसीआयसीआय बँकेच्या नोडल अधिकाऱयांशी संपर्क केला. बँक अधिकाऱयांनी प्रतिसाद देत कार्यवाही केली आणि गेलेल्या रकमेपैकी सात लाख रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. बँकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे पैसे कंपनीच्या खात्यावर जमा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोणत्याही कंपनीसंदर्भातील माहिती गुगलवर सहज मिळते. एखाद्या कंपनीचे मालक व कंपनीविषयी अन्य माहिती गुगलवर मिळत असल्याने सायबर चोरटे ही माहिती घेतात आणि त्याचा उपयोग फसवणुकीसाठी करतात. अशा फोनवर विश्वास न ठेवता खात्री करावी.
– ज्ञानेश्वर भोसले, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.